गुजरात मॉडेलचा देशभर गवगवा केला जात असला, तरी देशभरात एक रुपयाला टॉफी मिळते व तेवढय़ाच किमतीत अदानी उद्योग समूहाला एक मीटर जागा मिळते, असा हल्ला चढवून उद्योगपतींच्या हिताची धोरणे राबवणाऱ्या भुलभुलयाला बळी पडू नका, असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले.
काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय बनसोडे यांच्या प्रचारार्थ सोमवारी क्रीडा संकुल मदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार जयवंत आवळे, आमदार बसवराज पाटील, दिलीपराव देशमुख, अमित देशमुख, उमेदवार बनसोडे उपस्थित होते.
रणरणत्या उन्हात मोठय़ा संख्येने उपस्थित समर्थकांसमोर गांधी म्हणाले की, ही निवडणूक दोन विचारधारांची निवडणूक आहे. एक विचारधारा देश जोडण्याची भाषा करते, तर दुसरी देश तोडण्याची. एकाला देशाला प्रगतिपथावर नेत असताना सामान्य माणसाची प्रगती व्हावी ही इच्छा असते, तर दुसऱ्या विचारधारेत देश प्रगतिपथावर जात असताना काही निवडक लोकांचीच प्रगती अपेक्षित असते. सामान्यांचा विचार ते करीत नाहीत. ‘इंडिया शायिनग’च्या वेळी देशातील जनतेने अनुभव घेतला आहे. एनडीएच्या काळात भारत चमकत नव्हता, तर ती चमक नेत्यांच्या घरात व गाडीत दिसत होती. काँग्रेसची राजवट आल्यानंतर कोटय़वधी लोकांना रोजगार दिला गेला. शेतकऱ्यांसाठीचे ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले. शेतीमालाला वाढीव हमीभाव दिला. उद्योग वाढत असताना सामान्य माणसाचे हित लक्षात ठेवले.
गुजरात मॉडेलची देशभर चर्चा केली जात आहे ती केवळ लोकांची दिशाभूल करण्यासाठी. वाजपेयींच्या काळात वाजपेयी, अडवाणींची जोडी होती. आता अडवाणींऐवजी अदानी हे जोडीदार बनले आहेत. गुजरातमध्ये त्यांना ४५ हजार एकर जमीन केवळ ३०० कोटींत देऊ करण्यात आली. एक रुपयात तुम्हाला टॉफी मिळते. अदानींना एक मीटर जागा गुजरात सरकारने दिली. त्यांनी गुजरातमध्ये उद्योग सुरू केला तेव्हा त्यांच्याकडे ३ हजार कोटींची मालमत्ता होती, ती आता ४० हजार कोटींवर पोहोचली. ही वाढ केवळ जमिनीच्या किमतीची आहे. केवळ अदानी उद्योगपतीलाच या सवलती देण्यात आल्या. टाटा उद्योग समूहाला नॅनो गाडीसाठी १० हजार कोटींचे कर्ज गुजरात सरकारने एक टक्का दराने दिले. शेतकऱ्यांना मात्र १२ टक्क्यांनी कर्ज दिले जाते. गुजरात सरकारच्या शिक्षण व आरोग्याचा एकत्रित खर्चही १० हजार कोटींचा नाही. गुजरातमध्ये रोजगार मोठय़ा प्रमाणात उपलब्ध असल्याच्या गप्पा मारल्या जातात. प्रत्यक्षात तेथे ५ हजार रुपये पगाराच्या दीड हजार जागांसाठी साडेआठ लाखजणांनी अर्ज केले, म्हणजे एका जागेसाठी ५६० अर्ज. गुजरातमध्ये रोजगार मोठय़ा प्रमाणात उपलब्ध झाले असतील, तर एवढय़ा प्रमाणावर युवक रोजगार मिळावा म्हणून कशासाठी अर्ज करतील, असा सवालही गांधी यांनी केला.
गुजरातमध्ये दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांची संख्या ४० लाख आहे. ११ रुपये उत्पन्नाच्या खालील लोकांची ही संख्या आहे. ४० टक्के कुटुंबांना पिण्याचे पाणी मिळत नाही. ५० टक्के बालके कुपोषित आहेत. एक काळ गुजरातमध्ये छोटे उद्योग होते. आता ते बंद पडून मोठय़ा उद्योगांना प्रोत्साहन दिले जात आहे. जुने उद्योग बंद पाडून त्या जागा मॉल बनवण्यासाठी दिल्या जात आहेत. गुजरात सरकार केवळ खोटय़ा जाहिराती करीत आहे. त्याला बळी पडू नका, असे ते म्हणाले.
यूपीएचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास मोफत उपचार-औषधे, सर्वाना पक्की घरे, सर्वासाठी निवृत्तिवेतन लागू केले जाईल. त्याचा लाभ गरिबांना होईल. मेड इन चायनाऐवजी मेड इन इंडिया, महाराष्ट्र, लातूर अशी भूमिका घेऊन अधिकाधिक युवकांना रोजगार दिला जाईल. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात ज्या घोषणा केल्या त्याची भाजपने पूर्णपणे कॉपी केली आहे. आम्ही ज्या बाबी लागू केल्या, त्याचाही उल्लेख आपल्या जाहीरनाम्यात भाजपवाल्यांनी केल्याची टीका त्यांनी केली.
देशभर महिला सुरक्षेवर भर देणाऱ्या भाजपवाल्यांच्या राज्यात महिलांवर अत्याचार होतात. कर्नाटकमध्ये पबमध्ये जाणाऱ्या महिलांना मारझोड करण्यात आली. छत्तीसगढमधील २० हजार महिला गायब आहेत. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची शक्ती महिलांचे फोन टॅप करण्यात खर्ची पडते. पोलीस यंत्रणा अशा कामासाठी वाया घालवली जाते. देशभर जनता काँग्रेसच्या पाठीशी आहे. विरोधक हवा निर्माण करीत आहेत. हा फुगा निवडणूक निकालानंतर फुटेल, याची खात्री असल्याचे ते म्हणाले.
राहुल गांधी यांना अमित देशमुख यांनी तलवार भेट दिली. शिवाजीराव निलंगेकर यांनी गांधी यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष ठाकरे, आमदार दिलीपराव देशमुख, बसवराज पाटील, निलंगेकर, आवळे यांचीही भाषणे झाली.
मोदींच्या निम्मी गर्दी!
क्रीडा संकुलावरच राहुल गांधी यांची सभा घेऊन मोदी यांच्या सभेला तोडीस तोड उत्तर देण्याचे काँग्रेसने ठरवले होते. मात्र, मदानावर १० हजार खुच्र्या ठेवून मोदींइतकी गर्दी होणार नाही हे काँग्रेसने गृहीत धरले होते. त्यानुसार मोदी यांच्या सभेपेक्षा निम्मीच गर्दी क्रीडा संकुलावर होती.