11 December 2017

News Flash

माओवादी चळवळीला हादरा, नागपूरमधून नेत्याला अटक

गीतांजली एक्स्प्रेसमध्ये पोलिसांची कारवाई

नागपूर | Updated: August 8, 2017 4:22 PM

प्रतिकात्मक छायाचित्र

राज्यातील माओवादी चळवळीला मंगळवारी मोठा हादरा बसला असून नागपूरमधून माओवादी चळवळीशी संबंधीत मोठ्या नेत्याला सूरत पोलिसांनी अटक केली आहे. गीतांजली एक्स्प्रेसमधून नागपूरला परतत असताना पोलिसांनी त्याला अटक केली.

सूरत पोलिसांकडे २०११ मध्ये तुषार कांती भट्टाचार्य या माओवादी चळवळीशी संबंधीत नेत्याविरोधात गुन्हा दाखल होता. या गुन्हयाप्रकरणी सूरत पोलिसांनी तुषार कांती भट्टाचार्यला अटक केली. आठवडाभरापूर्वी तुषार कांती भट्टाचार्य कोलकाता येथे गेला होता. कोलकात्यामध्ये बहिणीची भेट घेण्यासाठी भट्टाचार्य गेला होता. भट्टाचार्यचा भाऊ कोलकात्यामध्ये तुरुंगात असून नक्षली कारवायांमधील सहभागाप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. सूरतमध्ये तुषार कांती भट्टाचार्यवर पोलिसांनी देशविरोधी कारवाया, नक्षली संघटनांशी संबंध या कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. सोमवारी तुषार भट्टाचार्य गीतांजली एक्स्प्रेसने नागपूरला परतण्यासाठी निघाला होता. नागपूरला येत असताना पोलिसांच्या पथकाने त्याला ट्रेनमधूनच अटक केली. यानंतर नागपूर विमानतळावरुन तुषारला सूरतला नेण्यात आले.

तुषार कांती भट्टाचार्यला यापूर्वी पाटणामधून अटक झाली होती. त्याच्याकडून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला होता. तुषार कांती भट्टाचार्यची पत्नी नागपूर विद्यापीठ प्राध्यापिका आहे. या कारवाईमुळे माओवादी चळवळीला मोठा हादरा बसल्याचे सांगितले जाते.  तुषार कांती भट्टाचार्यच्या कुटुंबीयांनी या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

First Published on August 8, 2017 4:22 pm

Web Title: gujarat surat police maoist cadre from geetanjali express in nagpur