गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल म्हणजे सामान्य माणूस मोदींच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचा पुरावा आहे, असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते सोमवारी नागपूर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीतील यशाबद्दल भाजप कार्यकर्त्यांचे आणि सामान्य जनतेचे आभार मानले.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, गुजरात आणि हिमाचल प्रदेशात भाजपला मिळालेले यश अभूतपूर्व आहे. भाजपविरोधात अनेक गोष्टी पेरण्याचा प्रयत्न झाला, रान उठवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मतदारांनी भाजपलाच साथ दिली. यावरून एकच गोष्ट सिद्ध होते की, देशाच्या प्रत्येक राज्यातील सामान्य माणूस मोदीजींच्या पाठिशी भक्कमपणे उभा आहे. या देशाला प्रगतीपथावर नेण्याची किंवा सामान्य माणसाचे भाग्य बदलण्याची क्षमता मोदींच्या नेतृत्त्वाच असल्याची बाब सामान्यांना पटली आहे. त्यामुळेच सामान्य जनतेने भाजपच्या विकासाच्या आणि विश्वासाच्या राजकारणाला प्रतिसाद दिला. २२ वर्षांनंतरही गुजरातमध्ये भाजप पक्ष पुन्हा सत्तेत आला. भाजपला याठिकाणी एकूण ५० टक्के मते मिळाली. आतापर्यंत जनतेने कोणत्याही पक्षावर इतका विश्वास दाखवला नव्हता. यानिमित्ताने जनतेने पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्त्वावर शिक्कामोर्तब केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.