20 October 2020

News Flash

मराठी पुस्तकात गुजराती धडा छापणाऱ्या मुद्रकावर कारवाई करणार: तावडे

सहावी इयत्तेच्या भूगोलाच्या पुस्तकाच्या छपाईचे काम एकूण ११ मुद्रणालयांकडे सोपवण्यात आले होते. यातील १ लाख प्रती या अहमदाबादमधील श्लोक प्रिंट सिटी या मुद्रकाकडे छापण्यात आल्या.

विनोद तावडे (संग्रहित छायाचित्र)

मराठी माध्यमाच्या सहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात गुजराती धडा असल्याचे समोर आल्यानंतर अखेर राज्याच्या शिक्षण विभागाने मुद्रकावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली.

गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे यांनी विधान परिषदेत मराठी पुस्तकात गुजराती धडा असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. सहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात सात पाने गुजरातीमधून असल्याचे समोर आले होते. यावरुन राष्ट्रवादीने सरकारवर टीकेची झोड उठवली होती. हे सरकार महाराष्ट्राचे गुजरातीकरण करत आहे का, या संदर्भात सरकारने खुलासा करावा, अशी मागणी विरोधकांतर्फे करण्यात आली होती.

सोमवारी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत याबाबत निवेदन दिले. ‘महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ आणि पुणे (बालभारती) तर्फे मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, उर्दू, कन्नड, तेलुगू आणि सिंधी या आठ भाषांमध्ये १२ कोटी पाठ्यपुस्तकांची छपाई केली जाते. २०१८ – १९ या वर्षात राज्यातील ११४ मुद्रकांनी एकूण छपाईच्या ९२ टक्के तर परराज्यातील २८ मुद्रकांनी ८ टक्के छपाईचे काम केल्याचे त्यांनी सांगितले.

सहावी इयत्तेच्या भूगोलाच्या पुस्तकाच्या छपाईचे काम एकूण ११ मुद्रणालयांकडे सोपवण्यात आले होते. यातील १ लाख प्रती या अहमदाबादमधील श्लोक प्रिंट सिटी या मुद्रकाकडे छापण्यात आल्या. संबंधित मुद्रकाकडून या पुस्तकाची बांधणी करताना मराठी भूगोलाच्या पुस्तकामध्ये गुजराती पुस्तकाची पृष्ठे लागल्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर मुद्रणालयाकडून झालेल्या चुकीबाबत खुलासा मागवण्यात येणार आहे. पुस्तकाची सदोष बांधणी करणाऱ्या मुद्रणालयावर कारवाई करण्याची तरतूद निविदेच्या अटी व शर्तींमध्ये आहे. त्यानुसार श्लोक प्रिंट सिटीवर कारवाई केली जाईल, असे तावडे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2018 4:17 pm

Web Title: gujrati pages in geography textbook of marathi medium vinod tawde promises strict action
Next Stories
1 सरकारला रस्त्यांवरचे खड्डे दिसत नसतील तर आंदोलन नक्कीच दिसेल – राज ठाकरे
2 डोक्यावर बर्फ ठेवा, संयम सोडू नका; राजू शेट्टींचा कार्यकर्त्यांना सल्ला
3 ‘५ बळी गेलेल्या रस्त्यावर ५ लाख लोकांचा प्रवास, हे वक्तव्य भावना दुखावण्यासाठी नव्हते’
Just Now!
X