भाजपाच्या राज्यातील नेतृत्वाकडून आपल्याला संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यांनी केलेल्या आरोपांवरून शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मात्र खडसे यांना चिमटे काढले. “नाथाभाऊंनी मला वडिलांसारखं प्रेम दिलं. मात्र मुलगा कधी मानलं नाही. त्यामुळे ही वाईट वेळ आली,” अशी राजकीय टोलेबाजी गुलाबराव पाटील यांनी केली.

भुसावळ येथे गुलाबराव पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना कानपिचक्या दिल्या. पाटील म्हणाले, “भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मला वडिलांसारखं प्रेम दिलं. मात्र मुलगा कधी मानलं नाही. त्यांनी मुलगा म्हणून माझा वापर केला असता, तर मी पक्का माणूस आहे. कधीही पाठिंमागे हटलो नसतो,” असं पाटील यांनी सांगितलं.

माझ्यासारखा सच्चा माणूस तुटला नसता –

“नाथाभाऊंनी सोबत ठेवलेल्या लोकांचा रक्तगट कधी तपासला नाही. त्यांनी रक्तगट तपासून माणसं ठेवली असती, तर गुलाबराव पाटलांसारखा सच्चा माणूस कधीही तुटला नसता. तुटू शकणारही नाही. कालसुद्धा रक्षा खडसे लोकसभेला उभ्या राहिल्या. तेव्हा मी त्यांच्या प्रचाराला गेलो होतो. माझी मागची दुश्मनी काढली नाही. मला या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना पाहायचं होतं,” असं गुलाबराव पाटील म्हणाले.

कधी वाटल होतं का तीन लोकांचं सरकार येईल –

राजकारणात परखड दुश्मनी नको. विचारांची लढाई आहे. ज्यादिवशी विचारांची लढाई सोडून निवडणूक लागेल. त्यावेळी मी तुमच्याविरूद्ध प्रचाराला येईन. मी प्रचाराला येईन. मी पुन्हा येईन. मी मनाने चालणारा माणूस आहे. मी कोणत्याही पक्षाचा आमदार मानत नाही. राजकारणात कधीच कोणी कोणाचा दुश्मन नसतो. कधी वाटलं होतं का तीन लोकांचं सरकार बनेल?,” असं गुलाबराव पाटील यांनी विचारताच हास्याची लाट आली.