25 April 2019

News Flash

पोलिसांसोबतच्या झटापटीत तोंडात गोळी लागल्याने आरोपी गंभीर जखमी

पोलिसांनी घरात घुसून काळबावर गोळ्या झाडल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे

संग्रहित छायाचित्र

गंभीर गुन्हातील पसार संशयित आरोपी विजय उर्फ काळबा रामभाऊ गायकवाड (वय ४२, रा. टेंबलाई फाटक, कोल्हापूर) याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांमध्ये व आरोपीत झालेल्या झटापट झाली. आरोपीच्या तोंडात गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. सीपीआर रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात विजय उर्फ काळबा गायकवाड याच्यावर बालक अपहरण करून खंडणी उकळणे , दरोडा, चोऱ्या मारामारी अशा १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणात तो फरारी होता. त्याच्यावर आणखी १२ गुन्हे दाखल आहेत. गुरुवारी गायकवाड महाडिक माळ परिसरातील आपल्या सासरवाडीत सासऱ्याच्या वर्षश्राध्दासाठी येणार असल्याची माहिती राजारामपुरी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या परिसरात सापळा रचला होता.

संध्याकाळी पत्नी आणि मुलासह काळबा तेथे येताच पोलिसांच्या तीन तुकड्या तेथील तीन घरात घुसल्या. त्यातील एका घरातून काळबाला पोलिसांनी ओढत बाहेर आणले. यादरम्यान पोलिसांसोबत त्याची झटापट झाली. काळबाने त्याच्याजवळील पिस्तुल पोलिसांवर रोखले, याचदरम्यान एका पोलिस कॉन्स्टेबलने मागच्या बाजूने त्याच्या अंगावर उडी घेतली. या घडामोडीत त्याच्याजवळील पिस्तुलातून निघालेली गोळी त्याच्याच तोंडात घुसली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ कोल्हापुरात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आले.डॉक्टरांनी काळबावर शस्त्रक्रिया केली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कोल्हापूरचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी पत्रकारांना दिली.

दरम्यान, काळबाची पत्नी अश्विनी आणि मुलगा सिध्दार्थ यांनी पोलिसांनी घरात घुसून गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. महिलांनी पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण महिलांशी झटापट करुन बाजूला केल्याचा आरोप त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. सीपीआर परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त असून तेथे प्रचंड गर्दी आहे. महाडिक माळ परिसरातही पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.

 

First Published on December 6, 2018 8:08 pm

Web Title: gun bullet fired in accused mouth seriously injured in kolhapur