पूर्णा येथील गुटखा माफिया सय्यद अली सय्यद हसन व सय्यद महमूद तांबोळी यांच्या एकबालनगरमधील घरावर छापा टाकून विविध कंपन्यांचा ५ लाख १७ हजारांचा गुटखा, ३ लाख ५१ हजारांची रोकड, २ एअर पिस्तुलांसह धारदार शस्त्रे असा ऐवज पोलिसांनी जप्त केला. गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास ही कारवाई झाली. महमूदला अटक केली, तर सय्यद अली फरारी झाला आहे.
सय्यद अली अनेक वषार्ंपासून अवैध गुटखाविक्री करतो. पूर्णेमध्ये अलीची ओळख गुटखा किंग अशीच आहे. वर्षभरापूर्वी त्याच्या अवैध गुटखाविक्रीचे वृत्त प्रसिद्ध होताच एका पत्रकारावर अलीने अॅसिड हल्ला केला होता. या प्रकरणात अलीला पोलीस कोठडीची हवा खावी लागली. नंतरही राज्यात गुटखा बंदी असताना अलीचा व्यवसाय बिनबोभाट चालू होता. परभणीचे परीविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक योगेश कुमार व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी सकाळीच सय्यद अली व सय्यद महमूद तांबोळी या दोघांच्या घरावर छापा टाकला. छाप्यात या दोघांच्या घरी ५ लाख १७ हजार रुपयांचा गुटखा मिळाला. यात विमल, सितार, गोवा आदी कंपन्यांच्या गुटख्याचा समावेश आहे. सय्यद अलीच्या घरातून गुटख्यासह ३ लाख ५१ हजार रोख रक्कम मिळाली. त्यांच्याकडेच दोन एअरगनसह धारदार शस्त्रे मिळून आली. अलीच्या घरातून इंडोनेशियाच्या १० हजार, २ हजार व १ हजाराच्या अशा ३ नोटा पोलिसांना मिळाल्या.
या प्रकरणी अन्न व भेसळ अधिकारी संजय चट्टे यांच्या तक्रारीवरुन सय्यद अली व सय्यद महमुद या दोघांविरुद्ध पूर्णा पोलिसात गुन्हा दाखल झाला. शस्त्रविषयक कायद्यान्वये सय्यद अली सय्यद हसन, भाऊ सय्यद हबीब व वडील सय्यद हसन या तिघांवर सहायक पोलीस निरीक्षक रावलवार यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला. सय्यद महमूद तांबोळीला अटक केली. सय्यद अलीसह इतर दोघे फरारी आहेत.