पावसाळा सुरू झाला तरी शहरातील सीना नदीपात्र व नाल्यांच्या सफाईला मुहूर्त लागला नाही. विशेष म्हणजे या कामासाठी मागवलेल्या निविदांची मुदत संपली तरी महानगरपालिकेला निविदा उघडण्यासच वेळ मिळाला नसल्याचे समजते.
गेले काही दिवस मनपात या कामाला मोठाच विलंब होत असून त्याचे दुष्परिणाम नागरिकांना पूर्ण पावसाळाभर भोगावे लागतात. पावसाळ्यापूर्वी मे महिन्यातच नदीपात्र व शहरातील छोटेमोठे नाले, गटारींची साफसफाई व्हावी, अशा अपेक्षा असते. पूर्वी ही कामे याच काळात होत होती. मात्र आता ही गरजेची कामेही रेंगाळू लागली आहेत. या वर्षी अजूनही हे काम सुरूच झालेले नाही. विशेष म्हणजे प्रशासन व पदाधिकारीही यावर ढिम्म आहेत.
मनपाने शहरातून जाणारे सीना नदीपात्र व नाल्यांच्या साफसफाईसाठी पूर्वीच निविदा काढली होती. मात्र पहिल्या दोन्ही वेळी निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. हे सुमारे १९ लाख रुपयांचे काम असून पहिल्या वेळी त्यासाठी दोनच निविदा दाखल झाल्या. त्या तीन तरी पाहिजे म्हणून मनपाने या कामासाठी तिस-यांदा निविदा मागवली आहे. तिस-या वेळी त्यासाठी दि. ६ पर्यंतची मुदत होती. ही मुदत टळून गेली तरी या निविदा उघडण्यासच मनपा प्रशासनाला वेळ मिळाला नसल्याचे समजते.
दरम्यान, मोसमी पावसाला आता सुरुवात झाली असून गेल्या तीनचार दिवसांपासून शहरात दररोज पावसाची हजेरी सुरू आहे. यातील दोनतीन वेळा मोठाच पाऊस झाला. या पहिल्या पावसातच शहरातील रस्त्यांची दैना झाली असून नाले, गटारींची साफसफाई न झाल्याने पाण्याचा निचरा आत्तापासूनच बंद झाला आहे. आता ही कामे करायची तरी पावसाचाच व्यत्यय असून पाऊस असाच टिकून राहिला तर, निविदा मंजूर होऊनही ही कामे होणे मुश्कील आहेत. त्याचे परिणाम नागरिकांना पुढे चार महिने तरी भोगावे लागतील.