पर्यटकांनी वाघाला घेरण्याच्या मुद्दय़ावरून अडचणीत आलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने अखेर दोन गाइड व दोन जिप्सी चालकांना निलंबित केले असून पुन्हा असे प्रकार घडू नयेत म्हणून पर्यटकांसाठी आणखी काही नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या उन्हाळा असल्यामुळे ताडोबात गर्दी करणारे पर्यटक चक्क वाघाला घेरत असल्याचे सचित्र वृत्त ‘लोकसत्ता’ने मंगळवारच्या अंकात प्रकाशित केले होते. हे वृत्त वाचून अनेक वन्यजीवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. येथील काही संघटनांनी या प्रकरणाची तक्रार राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाकडे केली होती. याच वृत्ताचा आधार घेत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी वनखात्याच्या कारभारावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. आठ दिवसांपूर्वी घडलेले हे प्रकरण आता बरेच गाजणार हे लक्षात येताच ताडोबा व्यवस्थापनाने या प्रकाराला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाईचा बडगा उगारला आहे. ताडोबाचे क्षेत्र संचालक वीरेंद्र तिवारी आणि कोअर झोनचे विभागीय वनाधिकारी सुजय डोडल यांनी ताडोबाचे प्रवेशद्वार असलेल्या मोहुर्लीला जाऊन पर्यटकांना सेवा देणाऱ्या गाइड व जिप्सी चालकांची एक बैठक घेतली. या बैठकीत गाइड व चालकांना उपदेशाचे बरेच डोस पाजण्यात आले. पैशाच्या मोहापायी असे प्रकार कराल तर यापुढे अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा तिवारी यांनी या वेळी दिला. पर्यटकांना सेवा देताना व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन झालेच पाहिजे, याकडे दुर्लक्ष करणाऱ्या गाइड व चालकांवर भविष्यात कठोर कारवाई करण्यात येईल अशी तंबी या सर्वाना देण्यात आली. यानंतर ‘लोकसत्ता’ने उघडकीस आणलेल्या घटनेला जबाबदार असलेल्या दोन गाइड व दोन चालकांना निलंबित करण्यात आले. यापैकी एका गाइडचे नाव वसंत सोनुले आहे, तर निलंबित करण्यात आलेल्या एका जिप्सीचा क्रमांक एमएच-१२-ई१६ असून ती मानकर यांच्या मालकीची असल्याचे मोहुर्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी शिंदे यांनी सांगितले. कारवाई झालेले उर्वरित दोघांची नावे ठाऊक नाहीत, असे ते म्हणाले. दरम्यान पर्यटकांच्या अतिउत्साहाला आवर घालण्यासाठी आता व्यवस्थापनाने गाइड व चालकांवर आणखी काही र्निबध लागू केले आहेत. प्रकल्पात फिरताना वाहने रस्त्याच्या खाली उतरवू नयेत, पाणवठय़ाच्या ठिकाणी ५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबू नये, वाहनाचा वेग मर्यादित ठेवावा, एकाच ठिकाणी वाहनांची गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा अनेक सूचना नव्याने देण्यात आल्या आहेत.