फासेपारधी समाजातील मुलांसाठी काम करणाऱ्या तरुणाची यशोगाथा
सत्तुऱ्या, धत्तुऱ्या, कैदी, डेंग्या, वकिल्या, भोज्या.. ही मुलांची नावे, पाच ते बारा-तेरा या वयोगटांतील ही मुले. यातील बहुतेकांचे वडील एक तर कुठल्या तरी तुरुंगात किंवा फरारी, बेपत्ता. काहींची आई भिक्षेकरी. शिक्षण दूर राहिले, अशा कुठल्या गोष्टींचा त्यांनाच काय, त्यांच्या कुटुंबात, नातेवाईकांत गेल्या पिढय़ांमध्ये कोणाला गंध नाही. या मुलांमध्ये राहण्यास कोणी तयार नव्हते. त्यांना शाळेत घालावे तर, प्रवेश कुठल्या नावाने घ्यावा, त्यांचा दाखला कसा करावा, हाच पहिला प्रश्न! यातून मार्ग शोधावा तरी, या मुलांना संस्थाचालक शाळेत प्रवेश देतील की नाही याचीही चिंता होतीच. या सगळ्या अडचणींवर मात करून थोडय़ाथोडक्या नव्हे, तर अशा ४० मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात तर आणलेच, शिवाय गावाच्या बाहेर पालावर वस्ती करून राहणाऱ्या या बालकांना हक्काचे घरही उपलब्ध करून दिले. यातील काही मुले आता फाडफाड इंग्रजी बोलू लागली आहेत, एक जण तर सेमी इंग्रजीत तालुक्यात पहिला आला!
‘शिकतो’ डोंबारी गं..!
ही मुले आहेत, जन्मत:च चोर-दरोडेखोर असा शिक्का बसलेल्या फासेपारधी समाजातील. आता त्यांचे आश्रयस्थान आहे, महामानव बाबा आमटे बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था. ठिकाण श्रीगोंदे, जिल्हा नगर. फारसे शिक्षण नसलेल्या अनंत झेंडे या ध्येयवेडय़ा तरुणाने ही संस्था उभी केली. खासगी शिक्षणसंस्थेत शिपायाची नोकरी सांभाळून त्याने या आदिवासी, फासेपारधी, डोंबारी अशा उपेक्षित समाजातील मुलांसाठी हा संसार उभा केला, तो केवळ लोकसहभागातून. शिपायाला पगार तो कितीसा? मात्र हा तुटपुंजा पगारही तो ‘या’ संसारासाठी वापरतो. संस्थेचा व्याप आता वाढतो आहे, मात्र आर्थिक मेळ घालणे हेच मोठे आव्हान आहे. सरकारी किंवा तशा तत्सम मदतीशिवाय सगळा उपद्व्याप सुरू ठेवताना आता त्याच्या मर्यादाही जाणवू लागल्या आहेत. मात्र लोकसहभागावर श्रद्धा ठेवून झेंडे यांचा हा खटाटोप सुरू आहे. ‘शिकतो’ डोंबारी गं..!
‘विद्यार्थी सहायक समिती’ या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या उपक्रमाचे रूपांतर आता शोषित, उपेक्षितांच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या महामानव बाबा आमटे बहुउद्देशीय सामाजिक विकास सेवा संस्था प्रकल्पात झाले आहे.