हर्षद कशाळकर

रायगड जिल्ह्यातील गिधाडांचा अधिवास मोठ्या संख्येनी घटला आहे. निसर्ग चक्रीवादळानंतर जिल्ह्यातील गिधाडांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले असण्याची शक्यता पक्षी निरीक्षक आणि अभ्यासकांनी वर्तवली आहे. लांब चोचीचे श्रीवर्धन, म्हसळा परिसरातील पांढऱ्या पाठीचे गिधाडांच्या संख्येत ३४ टक्क्यांनी तर महाड, कोलाड, वाकण व सुधागड (पाली) या परिसरातील लांब चोचीच्या गिधाडांच्या संख्येत १८ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले आहे.

जागतिक वन दिनानिमित्त महाराष्ट्रात प्रथमच वनखाते व सिस्केप संस्थेच्या वतीने गिधाड गणना घेण्यात आली. या गिधाड गणनेसाठी पहाटेपासून प्रत्येक ठिकाणी पाच ते सात जणांची पथके हजर होती व दिवसभर तेथील घरट्यांतील हालचाली, उडताना त्यांची दिशा, पुन्हा घरट्यांत येताना त्यांची दिशा अशा सर्व बाबींचा यावेळी निरीक्षणे त्यांनी नोंदवली. यावेळी स्थानिक बागायतदारांनी या गिधाडगणनेसाठी स्वेच्छेने सहकार्य केले. घरट्यांव्यतिरिक्त अपेक्षित ठिकाणी हवेत, झाडांवरील त्यांच्या हालचाली गणना गटांनी टिपल्या.

जिल्ह्यातील गिधाड वस्तींच्या ठिकाणी सिस्केप व वनखात्यातील कर्मचारींसोबत अनेक पक्षिमित्र व विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

देशात ९ प्रजाती

देशात गिधाडांच्या ९ प्रजाती आढळतात. त्यापैकी पांढऱ्या पाठीचे व लांब चोचीचे गिधाड या दोन प्रजाती रायगड जिल्ह्यात बहुतांशी आढळतात. ही बाब लक्षात घेऊन सिस्केप संस्था आणि वन विभागामार्फत जिल्ह्यात गिधाड संवर्धन प्रकल्प राबविले जात आहेत.

गेल्या २५ वर्षात झालेल्या या प्रयत्नामुळे गिधाडांचा नैसर्गिक अधिवास वाढविण्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात यश आले होते. मात्र टाळेबंदी आणि निसर्ग चक्रीवादळानंतर गिधाडांचा या परिसरातील अधिवास मोठ्या संख्येने घटल्याचे या गिधाड गणनेत दिसून आले आहे.

महाड तालुक्यातील नाणेमाची परिसरात पूर्वी ११ घरट्यांतून २२  ते २८  गिधाडे होती. तिथे कालच्या गणनेत ११ घरट्यांतून २२  गिधाडे दिसून आली. महाड तालुक्यातील वारंगी परिसरात पूर्वी १ घरटे व २ गिधाडे होती. या वर्षीच्या गणनेत देखील १ घरटे व २ गिधाडे दिसून आली.

वाघेरी परिसरात पूर्वी २ घरटी व ४ गिधाडे होती तर कालच्या गणनेत १ घरटे  व २ गिधाडे दिसून आली.

सुधागड पाली येथील सरसगड परिसरात पूर्वी लांब चोचीचे गिधाडांची ११ घरटी व २२ गिधाडे दिसायची, त्या ठिकाणी ८ घरटी व १६  गिधाडे दिसून आली. याव्यतिरिक्त हवेत उडताना, झाडांवर बसलेले अशा हालचाली करणारे चांदोरे येथे १७  तर नाणेमाची येथे ५  देहेन येथे ४ लांब चोचीचे गिधाडे दिसून आली.

पांढऱ्या पाठीच्या गिधाडांची संख्या घटली

या गणनेत पांढऱ्या पाठीच्या गिधाडांची श्रीवर्धन परिसरात पूर्वी ५४  घरट्यांतून १०८ गिधाडे होती. तिथे या गणनेत ३६ घरट्यांतून ७२  गिधाडे दिसून आली, तर चिरगांव  परिसरात पूर्वी ३४ घरट्यांतून ६८  गिधाडे होती. त्या ठिकाणी २२ घरट्यांतून ४४  पांढऱ्या पाठीची गिधाडे दिसून आली. याव्यतिरिक्त देहेन, मांजरवणे परिसरातील झाडांवर बसलेली २५ ते ३० गिधाडे वेगळी दिसून आली.

निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा श्रीवर्धन, म्हसळा आणि तळा या तालुक्यांना बसला. हजारो झाडे उन्मळून पडली. त्यामुळे गिधाडांचा अधिवासही धोक्यात आला. भीतीने अनेक गिधाडे स्थलांतरित झाल्याचे गिधाड गणनेत दिसून आले आहे. त्या तुलनेत इतर तालुक्यात गिधाडांची संख्या स्थिर आहे.

– प्रेमसागर मिस्त्री, पक्षी अभ्यासक, सिस्केप संस्था, महाड.

निसर्ग वादळ आणि टाळेबंदीचा परिणाम…..

गेल्या वर्षीपर्यंत ज्या ठिकाणी ३०० ते ३५० गिधाडे दिसून यायचे त्या ठिकाणी गिधाडांची संख्या रोडावल्याचे दिसून आले. गिधाड संवर्धन प्रकल्पांतर्गत गिधाडांना अन्नपुरवठा केला जायचा. मात्र टाळेबंदीच्या निर्बंधामुळे हा अन्नपुरवठा बंद पडला. त्यामुळे गिधाडांचे कुपोषण होऊन त्यांनी स्थलांतरण केला असल्याचा अंदाज अभ्यासकांना वर्तवला आहे. तर जून महिन्यात रायगडच्या किनारपट्टीवरील भागात निसर्ग वादळाचा तडाखा बसला. या वादळाने श्रीवर्धन, म्हसळा आणि तळा परिसरातील नारळाची झाडे. डोंगरमाथ्यावरील हजारो उंच झाडे उन्मळून पडली. याचा तडाखा गिधाडांच्या अधिवासांवर झाला. झाडांवर वास्तव्य करणाऱ्या गिधाडांचे अस्तित्व धोक्यात आले.