फेब्रुवारी व मार्चमधील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. नुकसानीचा आढावा घेत प्रशासनाने मदतीस पात्र शेतकऱ्यांची यादी तयार केली. यानुसार जिल्ह्य़ात १३ हजार ७२० शेतकरी नुकसान भरपाईस पात्र ठरले, परंतु अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना डावलण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
मागील २१ एप्रिलपर्यंत जिल्ह्य़ातील १३ हजार ३९ शेतकऱ्यांना ४ कोटी ६० लाख ५४ हजार रुपये नुकसान भरपाई वाटप करण्यात आली असल्याची माहिती आहे. यावर्षीच्या फेब्रुवारी-मार्चदरम्यान निसर्गाने शेतकऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ऐन उन्हाळी पिके जोमात असताना अवकाळी पावसासह गारपिटीने झोडपून काढले. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोटय़वधींचे नुकसान झाले. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई अनुदान देण्यासाठी प्रशासनाने सव्‍‌र्हे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची निवड केली, परंतु नुकसानीच्या सव्‍‌र्हे टेबलावरच झाल्याचा आरोप अनेक शेतकरी करू लागले आहेत. जिल्ह्य़ात ४ कोटी ९८ लाख ५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ५.३७ लाख, गोरेगाव ३ लाख, तिरोडा ४५.६ लाख, अर्जुनी मोरगाव ६५.६९, आमगाव १६०.६४, सालेकसा १७४.५४, सडक अर्जुनी ४३.६६, असा एकूण ४ कोटी ९८ लाख ५ हजार रुपये निधी मंजूर झाला.
शेतकऱ्यांमध्ये तालुकानिहाय गोंदिया १६६, गोरेगाव ५३, तिरोडा १३८४, अर्जुनी मोरगाव १६७५, आमगाव ४३३७, सालेकसा ४५०५, सडक अर्जुनी १६००, असे एकूण १३ हजार ७२० शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरले. यानुसार २१ एप्रिलपर्यंत ९२.३९ टक्के शेतकऱ्यांना निधी वाटप झाला. तालुकानिहाय गोंदिया तालुक्यातील १६५ शेतकरी, गोरेगाव ५३, तिरोडा १२७१, अर्जुनी मोरगाव १६००, आमगाव ४ हजार २१४, सालेकसा ४ हजार १५५, सडक अर्जुनी १ हजार ५८१ अशा १३ हजार ३९ शेतकऱ्यांना ४६०.५४ लाख रुपयांचा निधी वाटप झाला. गोंदिया तालुक्यातील १६५ शेतकऱ्यांना ५३.६६ लाख गोरेगाव तालुक्यातील ५३ शेतकऱ्यांना ३ लाख, तिरोडा तालुक्यातील १२७१ शेतकऱ्यांना ४१.१३ लाख, अर्जुनी मोरगाव १६०० शेतकऱ्यांना ६५ लाख, आमगाव तालुक्यातील ४ हजार २१४ शेतकऱ्यांना १४६.५१ लाख, सालेकसा तालुक्यातील ४ हजार १५५ शेतकऱ्यांना १५६.५४ लाख, सडक अर्जुनी तालुक्यातील १ हजार ५८१ शेतकऱ्यांना ७२० पकी १३ हजार ३९ शेतकऱ्यांना ४६०.५४ लाखांचा निधी वाटप झाले असून उर्वरित निधी ५ मे पर्यंत जमा होणार असल्याची माहिती संबंधितांनी दिली. मार्चमधील अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे गहू, हरभरा, लाखोळी, भाजीपाल्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले, परंतु नुकसानीची यादी तयार करताना पिकांचे पंचनामे व्यवस्थित न करता कार्यालयात बसूनच याद्या तयार झाल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी लावला आहे. ज्यांनी पिके घेतलीच नाही अशांची नावे असून खरे नुकसानग्रस्त मात्र दूरच राहिले, अशी परिस्थिती असल्याने खरे नुकसानग्रस्त शेतकरी मात्र नुकसान भरपाईची चातकासारखी वाट बघत आहेत. वंचित शेतकऱ्यांचे काय? अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, परंतु अशा शेकडो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे पात्र शेतकऱ्यांच्या यादीत नसल्यामुळे नुकसानभरपाईपासून वंचित राहणार आहेत. विशेष म्हणजे, नुकसान भरपाईवरून प्रत्येकच वेळी हाहाकार निर्माण होतो. मागील पावसाळ्यात सुद्धा अतिवृष्टीमुळे झालेल्या संदर्भात अनेकांनी आवाज काढला, परंतु त्यांचा कोणताच फायदा झाला नाही. शिवाय, अशांना वंचित ठेवणाऱ्यांवर सुद्धा कसलीही कार्यवाही झाली नाही. वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे. यापूर्वी नुकसान भरपाईसाठी ओरडणाऱ्या वंचितांकडे कोणीच लक्ष दिले नाही. यामुळे अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त व नुकसान भरपाईपासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांचे काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.