पीकविम्याच्या निकषांमध्ये बदल करून निवडणूक आयोगाच्या परवानगीने गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत देण्यात येईल, असे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी उस्मानाबाद येथे सांगितले. या गारपिटीबाबत आपण पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबरोबर दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली आहे, असेही ते म्हणाले. राज्याच्या काही भागांत गारपीटीने व अवकाळी पावसाने रविवारीही तडाखा दिला असून त्यामुळे कोटय़वधी रुपयांच्या पिकांची हानी झाली आहे. कोकणात हवामान बदलामुळे आंबा आणि काजूही धोक्यात आला आहे. बीड जिल्ह्य़ात रविवारी तिघांचा तर शनिवारी हिंगोली जिल्ह्य़ात गारपीटीमुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू ओढवला.
बीडमध्ये गारपिटीमुळे तिघांचा मृत्यू ओढवला. गारपिटीचा तडाखा पाळीव प्राण्यांनाही बसला असून बीडमध्ये ६५ गायी, १०० शेळ्या आणि कोंबडय़ाही मृत्युमुखी पडल्या आहेत.
उस्मानाबाद येथे पवार म्हणाले की, ही केवळ राज्यावर आलेली आपत्ती नाही, तर देशासमोरील मोठी समस्या असल्याने शेतकऱ्याला सावरण्यासाठी केंद्र सरकारला लक्ष घालावे लागेल.
हिंगोली जिल्ह्य़ात अस्मानी प्रकोप रविवारीही सुरूच राहिला. तालुक्यातील अनखळी, पोटा, डिग्रस, वाणी या गावांत दुपारी तीन वाजता पुन्हा गारपीट झाली. शनिवारी गारा डोक्यात पडल्याने गव्हाची कापणी करायला गेलेल्या नांदुसा येथील शेतकरी परसराम टोपाजी आढे (वय ७०) यांचा मृत्यू झाला. जिल्ह्य़ात शनिवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह हिंगोली, सेनगाव तालुक्यातील अनेक गावांत गारांचा पाऊस झाल्याने हजारो हेक्टर जमिनीवरील रब्बी पिके भुईसपाट झाली.
गेल्या पाच दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्य़ाला  वादळी  पाऊस व गारपिटीने चांगलेच झोडपले आहे. जिल्ह्य़ातील  तेराही तालुक्यातील सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्रावरील अंतिम टप्प्यातील गहू, हरबरा, मका ही रब्बीची पिके, भाजीपाला व फ ळबागा नष्ट झाल्या आहेत. वादळी पाऊस व गारपिटीमुळे कोटय़वधी रुपयांच्या पिकांची हानी झाली आहे. बुलढाणा जिल्ह्य़ात १०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
महायुतीतर्फे आज निदर्शने
शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडल्याच्या विरोधात सोमवार १० मार्चला बुलढाणा जिल्ह्य़ात महायुतीतर्फे निदर्शने करण्यात येणार आहेत. या निदर्शनांमध्ये अनेक नेते सहभागी होतील.
आंबा, काजूला धोका
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्य़ालाही आंबा व काजू बागायतदारांना बदलत्या वातावरणाचा फटका बसला आहे. सध्या उष्णता, थंडी-गारव्याची तीव्रता जाणवते. या बदलत्या हवामानामुळे आंबा फळाची घट झाली आहे. तसेच आंबा व काजू बागायतीचा मोहोर जळून गेला आहे. सुरूवातीला बागायतदारांना वातावरण चांगले होते, पण मध्यंतरी थंडीचा गारवा बदलत्या चक्राने त्याचा फटका बसला आहे. जिल्हयातील विस्तीर्ण सागरी किनाऱ्यावरून मध्यंतरी वारे वाहू लागले होते. या वाऱ्याचा फटकाही काही बागायतदारांना बसला.
केंद्राचे पथक दोन दिवसांत राज्याच्या दौऱ्यावर
मुंबई :  राज्याच्या विविध भागात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे आतापर्यंत सात लाख हेक्टर रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत सुरू केली असून या परिस्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक दोन दिवसात राज्याच्या दौऱ्यावर येणार आहे. सुमारे ४५० ते ५०० कोटींचे नुकसान झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन सचिव मिलिंद म्हैसकर यांनी दिली. गारपिटीचा सर्वाधिक फटका राज्यातील १० ते १२ जिल्ह्यंना बसला आहे. मराठवाडय़ातील सर्व  जिल्ह्यंसह नाशिक, जळगाव, अमरावती आदी जिल्ह्यांमध्येही नुकसान झाले आहे. ज्यांचे घर, जनावारांचे नुकसान झाले आहे, त्यांना मदत देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. नुकसानीचे पंचनामे झाल्याशिवाय मदत देण्यात अडचणी असून हे पंचनामे सुरू आहेत, असेही ते म्हणाले