राज्याच्या बहुतेक भागास गारपिटीचा तडाखा बसला असून, हजारो कोटींचे नुकसान झाले, अनेकांचे संसार उघडय़ावर आले. निसर्गाच्या तांडवात आर्थिक हानी तर झालीच, पण गारपीटग्रस्तांना मानसिक धक्काही बसला. अशा वेळी गारपीटग्रस्तांना मानसिक आधार देणे आवश्यक ठरले असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांनी म्हटले आहे.
डॉ. आनंद नाडकर्णी (ठाणे), डॉ. विनय बाऱ्हाळे (औरंगाबाद) व डॉ. मििलद पोतदार (लातूर) यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना ही गरज व्यक्त केली. डॉ. नाडकर्णी म्हणाले, ‘‘अशा प्रकारच्या नसर्गिक आघातामुळे मानसिकदृष्टय़ा खचलेपणाची भावना बळावते. निराशा, हताशपणामुळे आंतरिक ऊर्जा हरवली जाते. वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी नसते. पुढे पर्याय शोधता येत नाहीत. त्यामुळे प्रयत्नवादाकडून माणसे दैववादाकडे वळतात. संसर्गजन्य आजाराप्रमाणे निराशावाद संक्रमित होण्याची अधिक शक्यता आहे. समाजाने अशा प्रसंगात सर्व भेदाभेद विसरून माणूस म्हणून मदतीस पुढे आले पाहिजे. देण्याची भावना महत्त्वाची आहे. बाहेरच्या मदतीची वाट न पाहता लोक एकत्र येऊन अधिक शक्ती निर्माण करू शकतात. त्यातून भयग्रस्त वातावरण दूर होण्यास मदत होईल.’’
डॉ. बाऱ्हाळे म्हणतात, ‘‘अशा प्रकारच्या आपत्तीत होणारे शारीरिक व मानसिक नुकसान प्रचंड असते. निराशा, चिंता याचे पर्यवसान व्यसनाधीनतेकडे वळण्यात होऊ शकते. संकटावर मात करता येऊ शकेल, असा धीर देण्याची गरज आहे. अशा प्रसंगात औषधांचाही उपयोग चांगला होतो. त्यासाठीही व्यापक नियोजन करावे लागेल. धार्मिकतेचा समाजावर मोठा पगडा आहे. प्रवचनकार, कीर्तनकार यांच्या मदतीने संकटाला सामोरे कसे जायला हवे हे सांगितले तर कमी काळात अधिक लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवता येईल.’’
डॉ. पोतदार म्हणाले, ‘‘गारपीटग्रस्त भागातील आर्थिक हानी प्रचंड आहे. प्रथमत ही हानी काही प्रमाणात का होईना भरून काढण्याचा दिलासा सरकारने त्वरित दिला पाहिजे, त्या दृष्टीने वेगाने पावले उचलणे क्रमप्राप्त ठरते. किल्लारीतील भूकंपानंतर मानसोपचार तज्ज्ञांचे पथक लोकांना भेटण्यास गेले होते. त्याच धर्तीवर राज्याच्या विविध भागात असा प्रयोग पुन्हा करण्याची वेळ आली आहे. नुकसानीची प्रतिक्रिया म्हणून राज्यात दोघांनी आत्महत्या केली. इतरही अनेकांच्या मनात अशा विचारांनी घर केलेले असते. त्यापासून त्यांना वेळीच परावृत्त करून जगण्याची उमेद दिली पाहिजे.’’
तातडीने काय करता येईल?
*स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने दिलासा देण्यासाठी लोकांना भेटणे.
*सरकारच्या वतीने पंचनामे व आर्थिक मदतीची वेगवान कारवाई.
*मानसोपचारतज्ज्ञांची  मदत घेणे.
*कीर्तनकार, प्रवचनकारांमार्फत प्रबोधन.