गारपीटग्रस्तांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आश्वासने व प्रसंगी आंदोलनाचे इशारे देणाऱ्या सर्वपक्षीयांना नंतर मात्र याचा विसर पडला असल्याचे स्पष्ट होत आहे. गारपीटग्रस्तांना एकरी सरसकट एक लाखाची मदत दिली जावी, अशी मागणी सर्वपक्षीय बठकीत करण्यात येऊन या प्रश्नी सर्व जण रस्त्यावर उतरतील, असा इशारा जि.प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांच्या पुढाकाराने देण्यात आला होता. दुसरीकडे भाजपनेही १६ मार्चपूर्वी गारपीटग्रस्तांना मदत न दिली गेल्यास सोमवारी (दि. १७) आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, प्रत्यक्षात गारपीटग्रस्तांच्या प्रश्नाला फाटा देत धुळवड खेळणेच भाजपने पसंत केले.
गेल्या १० मार्चला गारपीटग्रस्तांच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बठक घेण्यात आली. या बठकीपूर्वी भाजप प्रदेश सरचिटणीस माजी आमदार संभाजी पाटील निलंगेकर व जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे यांनी सरकारने गारपीटग्रस्तांना १६ मार्चपूर्वी मदत न दिल्यास १७ मार्चला जिल्हय़ातील शेतकरी शासकीय कार्यालयात आपल्या कुटुंबीय व जनावरांसह तळ ठोकतील. गावात येणाऱ्या बँकेच्या वसुली अधिकारी व वीजवसुली अधिकाऱ्यास कोंडण्याचा इशाराही बठकीत देण्यात आला होता. सोमवारी धुळवडीची सुटी होती. आधी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याकडे डोळेझाक करून भाजपनेही गारपीटग्रस्तांच्या प्रश्नावर अखेर धुळवडच खेळली. गारपिटीने राज्यात सर्वाधिक नुकसान लातुरात झाले आहे. ज्या बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज दिले, त्याच्या वसुलीसाठी अधिकारी ‘मार्चअखेर’ असल्यामुळे फिरत आहेत. अशा अधिकाऱ्यांना कोंडून ठेवणे सोडाच, त्यांना भाजप कार्यकर्त्यांनी कुठे हटकल्याचेही दिसून आले नाही.
मुख्यमंत्र्यांनी किल्लारी, तर भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी लातूर, चाकूर, अहमदपूर, कंधार या तालुक्यांतील शेतकऱ्यांशी संवाद साधला. सरकारने गारपीटग्रस्तांना दोन दिवसांत मदत जाहीर न केल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा इशारा मुंडे यांनी दिला होता. मुख्यमंत्र्यांनीही किल्लारीतील शेतकऱ्यांना दोनच दिवसांत मदत देण्याचा निर्णय करू. केंद्राकडून मदतीस उशीर लागणार असल्यामुळे राज्य सरकारकडून तातडीने मदत दिली जाईल व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ती थेट जमा होईल, असे सांगितले होते. मात्र, आठवडा उलटूनही भाजपने गारपीटग्रस्तांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही.
जि.प.चे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, भाजप, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, मनसे या सर्वानी एकत्र येत गारपीटग्रस्तांच्या प्रश्नावर संघर्ष करण्याचा इशारा दिला होता. बनसोडे लातूर लोकसभा निवडणुकीच्या तयारीत मग्न आहेत. मनसेने निटूर येथे रास्ता रोको आंदोलन केले होते. चळवळीत नेतृत्व करणारे अॅड. मनोहरराव गोमारे, उदय गवारे हे सतत आंदोलने करीत असतात. पुन्हा त्यांनीच रस्त्यावर उतरावे, अशी अपेक्षा नाही. मात्र, एकत्र येऊन लढा देऊ, असे टाळय़ा घेणारे विधान कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
उद्या भाजपतर्फे रास्ता रोको
दरम्यान, गारपीटग्रस्तांना एकरी १ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करावे, वीजबिल माफ करावे या मागणीसाठी गुरुवारी (दि. २०) तालुक्याच्या ठिकाणी रास्ता रोको करणार असल्याचे पत्रक भाजपतर्फे प्रसिद्धीस देण्यात आले आहे.