राज्यातील बहुतांश भागांत सातत्याने होणारी गारपीट आणि अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या गारपिटीमुळे अनेक जिल्ह्य़ांतील बाधित  क्षेत्रांत सातत्याने वाढ होत आहे. पंढरपूरजवळ घरावरील पत्रे उडून गारा अंगावर पडल्याने एका पाच महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. दरम्यान,  इतके दिवस अपवाद ठरलेल्या पुणे जिल्ह्य़ातही गुरुवारी गारांचा वर्षांव झाला. तर कोपरगावच्या पश्चिम भागालाही गुरुवारी गारा व वादळी पावसाने झोडपले.
पंढरपूरजवळील होळे येथे अनिल दत्तात्रेय भुसनर यांच्या वस्तीवर वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसाने थैमान घातले. त्यामुळे भुसनर यांच्या घरावरील पन्हाळी पत्रे उडाले.  त्या वेळी सहा महिन्यांच्या मुलाला गारांचा मार लागला. यात त्याचा मृत्यू झाला. तर देवडे येथे घराचे छप्पर उडून त्यापाठोपाठ घरातील पाळणाही सर्वाच्या देखत ५०फूट उंचावर गेला. मात्र पाळण्यातील सहा महिन्यांच्या मुलाचे प्राण वाचले.
सोलापुरात आतापर्यंत आठ बळी
सोलापूर जिल्हय़ात गेल्या २६ फेब्रुवारीपासून गारपीट व वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचे लक्ष शासनाच्या मदतीकडे लागले आहे. जिल्हय़ात ९३ हजार ७०२ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे पंचनामे झाले आहेत. शेतीसह घरे, शाळा व वीज वितरण कंपनीचे मिळून सुमारे २६२ कोटींचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध झाली आहे. जिल्ह्य़ात आतापर्यंत आठ जणांचे बळी गेले तर  ५० जण जखमी झाले आहेत.  
िहगोली जिल्ह्य़ात ४ ते ८ मार्चदरम्यान ४ वेळा गारपिटीच्या पावसामुळे सुमारे २२ हजार ५१८ हेक्टर शेतावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल प्रशासनाकडे सादर होत असतानाच पाचव्यांदा गारपिटीच्या पावसामुळे नुकसानीचे क्षेत्र वाढून ४० हजार ८६७ हेक्टरझाले. प्रशासनाने सुरुवातीला पाठविलेल्या नुकसानीच्या अहवालावरून सरकारने दोन टप्प्यांत सुमारे ११ कोटींचा निधी दिला. मात्र, एकूण ५३ कोटी निधीची गरज असताना उर्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आतापर्यंत मदतीची प्रतीक्षा करावी लागली. तर अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे परभणी जिल्हय़ात १ लाख २३ हजार ९८३ हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांसह फळबागांचे नुकसान झाले.  
बीडसह २८ जिल्हय़ांत गारपीट व अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. सरकारचे प्रतिनिधी दौरा करून निवडणुकीची आचारसंहिता मदतीस आड येत असल्याचे सांगत आहेत.
जालन्यात पथकाची धावती भेट
जिल्ह्य़ातील ९२ हजार ६४० हेक्टर क्षेत्रावरील फळ व अन्य पिकांना अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसला असून केंद्राच्या द्विसदस्यीय पथकाने गुरुवारी जिल्ह्य़ातील ५ गावांचा धावता दौरा केला. भोकरदन तालुक्यातील अन्वा, जळगाव सपकाळ, वाकडी, कारलावाडी गावांच्या शिवारातील पिकांच्या नुकसानीची पथकाने पाहणी केली.

पुण्यातही गारा
पुणे जिल्ह्य़ाच्या बहुतांश भागात गेले दोन आठवडे गारांचा वर्षांव होत असताना अपवाद ठरलेल्या पुणे शहराचा काही भाग व पिंपरी-चिंचवड परिसरात गारा पडल्या व अनेक भागांमध्ये वादळी पाऊसही कोसळला.  पुणे व पिंपरी-चिंचवडच्या काही भागांत गारा पडल्या. विशेषत: कात्रज-आंबेगाव परिसर, सिंहगड रस्त्यावर धायरी, पिंपरी-चिचवड परिसरात आकुर्डी, गुरव पिंपळे, दापोडी या भागांत गारा पडल्या.   पुण्यात शुक्रवारीही वादळी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.