वादळीवारा व गारांसह कोसळलेल्या धुवाँधार अवकाळी पावसाने दक्षिण रत्नागिरीला झोडपून काढले. विशेषत: लांजा व राजापूर तालुक्यांतील ग्रामीण भागाची दाणादाण उडाली. लांजा तालुक्याच्या पूर्व भागात सुमारे अर्धा तास कोसळलेल्या पावसाने आंबा, काजू पिकांचे वाऱ्यामुळे अनेक वृक्ष आणि विद्युत पोल कोलमडून पडले आहेत. नुकसानीची खरी आकडेवारी अद्याप हाती आली नसली, तरी प्राथमिक अंदाजानुसार  लांजा तालुक्यात २० ते २५ लाखांपेक्षाही जास्त नुकसान झाले असण्याची शक्यता आहे. बुधवारी सकाळपासूनच संपूर्ण जिल्ह्य़ात ढगाळ वातावरण होते. उष्म्यानेही कहरच केला होता. लांजा तालुक्यात तर दुपारनंतर मेघगर्जनेला सुरुवात झाली आणि सायंकाळी ३ वा.च्या सुमारास वादळीवारे वाहू लागले. त्यापाठोपाठ मुसळधार पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी मोठय़ा प्रमाणात तर काही ठिकाणी तुरळक सरी पडत होत्या. सुमारे अर्धा तास बरसलेल्या या पावसाने लांजावासीयांची त्रेधा उडवून दिली. वादळीवाऱ्यामुळे आंबा व काजूची फळे गळून गेली, तर अनेक जुने वृक्ष उन्मळून पडले. काही गावात विजेचे खांबही जमीनदोस्त झाले. एकूणच कालच्या त्या आपत्तीत लांजा तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. लांजा तालुक्यातील पूर्वेकडील खोरनिनको, हर्दखळे, वेरवली, खेरवसे, केळंबे आदी गावांमध्ये या अवकाळी पावसासह वादळीवाऱ्याने थमान घातले होते. अनेक घरांच्या छपरावरील पत्रे व कौले या वाऱ्यात उडून गेल्याचे सांगण्यात आले. लांजा, राजापूरसह जिल्हय़ात सर्वत्र ढगाळ वातावरण असून उष्म्यामुळे सर्वाचाच जीव कासावीस झाला आहे. येत्या २४ तासात कोकणात वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.