तालुक्यातील अनेक गावांना आज, रविवारी गारपिटीने झोडपले. त्याचा फळबागांना मोठा तडाखा बसला आहे. शासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानीच्या प्रमाणात भरपाई देण्याची मागणी पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे यांनी काल, शनिवारी वडनेर बुद्रुक येथे पाहणी केल्यानंतर केली. दहा, वीस हजारांच्या अनुदानाने लाखो रुपयांच्या भरपाईची तोंडमिळवणी होणार नाही, असेही झावरे म्हणाले. दरम्यान, आज दुपारी दोन वाजल्यापासून तालुक्यात बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाला सुरुवात झाली असून काही ठिकाणी गारपिटीने फळबागा तसेच शेतमालाचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

शनिवारी सायंकाळी निघोज तसेच वडनेर बुद्रुक परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर यांनी दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार सुमारे सव्वाशे हेक्टरवरील फळबागांना या गारपिटीचा तडाखा बसला असून विशेषत: वडनेर बुद्रुक येथे जवळपास सर्वच फळबागा जमीनदोस्त झाल्या आहेत. रविवारी सकाळी सभापती झावरे यांनी सदस्या पुष्पा वराळ, सदस्य दिनेश बाबर यांच्यासह पाहणी केली. शेतकऱ्यांना धीर देत नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, जि. प. अध्यक्षा शालिनी विखे यांच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.     झावरे यांनी भेट दिलेल्या बाळासाहेब शंकर शेटे या शेतकऱ्याच्या चार एकरावरील डाळिंब पिकाचे शनिवारच्या गारपिटीने होत्याचे नव्हते झाले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने शेटे कुटुंबीय व्यथित झाले होते. एकरी तब्बल तीन ते साडेतीन लाख खर्चून शेटे यांनी या बागेचे संगोपन केले होते. कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठी त्यांनी पत्नीच्या गळयातील मंगळसूत्र मोडून औषधे खरेदी केली होती.

अभियंता गणेश बोराडे याने नोकरी सोडून कलिंगडाची बाग विकसित केली होती. सर्वस्व पणाला लावून कलिंगडाच्या बागेचे संगोपन केले. लवकरच बागेतील कलिंगडे परिपक्व होऊन विक्रीसाठी जाणार होती, मात्र त्यापूर्वीच गारपिटीने संपूर्ण बागेतील फळांचे नुकसान झाल्याने मोठय़ा आशेने शेतीकडे वळालेला गणेश हतबल झाल्याचे त्याच्या देहबोलीवरून स्पष्टपणे जाणवत होते.

पत्रकारांशी बोलताना झावरे म्हणाले, गेल्या दोन अडीच वर्षांपासून शेतमालाला भाव नाही. मागील दोन वर्षे पाऊसही नसल्याने शेतकरी अडचणीत आहे.

यंदा बऱ्यापैकी पाऊस होऊन पिचलेला शेतकरी पुन्हा उभा राहण्याचा प्रयत्न करीत असताना अशा अस्मानी संकटाने त्याचे कंबरडे पूर्णपणे मोडले आहे. कृषी विभागाने नुकसानभरपाईचे निकष बदलून नुकसानीच्या प्रमाणात भरपाई द्यावी. शासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारावे लागेल.

दरम्यान, रविवारी दुपारी दोननंतर शहरासह तालुक्याच्या अनेक भागांत वादळी वारा तसेच मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. कान्हूरपठार, निघोज, पाडळी, काळेवाडी भागात गारपिटीचे वृत्त असून फळबागा तसेच शेतांमधील उन्हाळी पिकांना त्याचा तडाखा बसला आहे. रविवारी लग्नतिथ असल्याने वऱ्हाडी मंडळींची पावसामुळे चांगलीच तारांबळ झाली. पारनेरमधील आठवडे बाजार तसेच बाजार समितीमधील कांदा विक्री केंद्रालाही पाऊस तसेच वादळी वाऱ्याचा फटका बसला.