11 August 2020

News Flash

रायगड जिल्ह्य़ातील निम्मा भाग दोन आठवडय़ांनंतरही अंधारात

वादळग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत अन् नेत्यांचे मात्र राजकारण

संग्रहित छायाचित्र

हर्षद कशाळकर

निसर्ग चक्रीवादळाला १७ दिवस झाले तरी निम्मा रायगड जिल्हा अद्यापही अंधारात आहे. वादळात नुकसान झालेल्या वीज तारा आणि अन्य उपकरणे बसविण्याचे काम सुरूच आहे. अशा वेळी मदतीकडे अधिक लक्ष देणे आवश्यक असताना शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये परस्परांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

जिल्ह्य़ातील जनता चक्रीवादळाच्या संकटाने बेजार झाली आहे. त्यांना मदत करण्याचे सोडून राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्यात मग्न आहेत. परिस्थिती गंभीर आहे. आजही वादळाच्या सतरा दिवसांनंतरही अर्धा रायगड अंधारात आहे. लोक बेघर आणि संकटात आहेत. अशा आपत्तीच्या काळात तरी राजकारण बाजूला ठेवून वादळग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यावर भर द्या अशी नागरिकांची भावना आहे.

मदत वाटपावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ठिणगी पडली आहे. तर भाजपनेही राष्ट्रवादी काँग्रेसवर मदतवाटपात पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप केला आहे. या साऱ्या गोंधळात सामान्यांना वाली कोण? असा साहजिकच प्रश्न निर्माण होतो.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीच्या स्थापनेपासूनच रायगड जिल्ह्य़ात कुरबुरी सुरू होत्या. मात्र नंतर पालकमंत्री आदिती तटकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांचा विरोध कमी केला. सगळे काही सुरळीत झाले असतानाच महाविकास आघाडीत निसर्ग चक्रीवादळाच्या मदत वाटपावरून ठिणगी पडली आहे.

शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीवर टीका केली. पालकमंत्री आदिती तटकरे प्रशासनावर दबाव टाकून येणारी मदत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देण्यास भाग पाडत असल्याचा आरोप केला. मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेली मदत पाकिटे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देण्यास पालकमंत्र्यांनी भाग पाडल्याचा दावा त्यांनी केला.

खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन नवगणेंना प्रत्युत्तर दिले. बारा वाजता उठणाऱ्यांना जनतेच्या भावना कशा कळणार असा टोला त्यांनी लगावला. आम्ही कुठलाही पक्षीय भेदभाव करत नाही, कोणत्याही अधिकाऱ्यावर दबावही आणला नाही. पक्षीय भेदभाव केला नाही. प्रत्येकाने आपआपल्या पद्धतीने काम करावे, आम्ही सेनेच्या आमदारांना सोबत घेऊन काम करत आहोत. ज्यांना राजकारण कळत नाही. त्यांनी उगाचच टीका करू नये, जनता संकटात असताना राजकारण करू नका असे आवाहन त्यांनी केले.

भाजपची नाराजी

शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाद सुरू असतानाच, भाजपच्या आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार रवीशेठ पाटील या वेळी उपस्थित होते. या वेळी मदत वाटपात स्थानिक लोकप्रतिनिधींना डावलले जात असल्याची तक्रार रवीशेठ पाटील यांनी केली. स्थानिक प्रशासनाला सूचना द्याव्यात अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला. त्यांचा रोखही पालकमंत्री आदिती तटकरे यांच्यावर होता. पालकमंत्री पक्षपातीपणा करत असल्याचे त्यांनी या वेळी म्हटले. भाजपच्या वतीने याबाबत कुठलेही निवेदन देण्यात आले नाही आमचे निरीक्षण आम्ही जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिक जगताप हे आपली नाराजी वेळोवेळी बोलून दाखवत आहेत. त्यामुळे आघाडीतील कुरबुरी चव्हाटय़ावर येण्यास सुरुवात झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 12:23 am

Web Title: half of raigad district is still in darkness after two weeks abn 97
Next Stories
1 शिक्षण अधिकारी कार्यालयात शिवसैनिकांचा गोंधळ
2 सदोष पंचनाम्याने दापोलीत खळबळ
3 धुळ्यात दोन दिवसात करोनाचे १११ रुग्ण
Just Now!
X