हिंगोली लोकसभेच्या जागेचा तिढा पक्षाने लवकर सोडवावा, अन्यथा पक्षातून अर्धे कार्यकर्ते पळून जातील, अशा शब्दांत केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला. काँग्रेसच्या सहकार्याविना ही जागा राष्ट्रवादी जिंकू शकते, असा दावाही त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ‘सांप्रदायिकता छोडो, भारत जोडो और विकास की ओर चलो’ ही युवक संदेश यात्रा मंगळवारी शहरात दाखल झाली. युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या यात्रेनिमित्त राष्ट्रवादी भुवन येथे पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात सूर्यकांता पाटील बोलत होत्या. नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी खासदार शिवाजी माने, अप्पाराव देशमुख, जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल आदी उपस्थित होते. या मतदारसंघात हिंगोली, नांदेड व यवतमाळ या तीन जिल्ह्य़ांचा समावेश आहे. या जिल्ह्य़ांतून राष्ट्रवादी संपवायची असेल, तर पक्षाने ही जागा काँग्रेसला सोडावी, असा इशारा देऊन या जागेचा तिढा पक्षाने लवकर सोडवावा अन्यथा अर्धे कार्यकर्ते आपला पक्ष सोडून पळतील, असा घरचा आहेर त्यांनी दिला. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने सहकार्य केले नाही, तरी राष्ट्रवादी ही जागा स्वबळावर जिंकणार असल्याचा दावा त्यांनी केला. आपल्या पराभवाचे खापर त्यांनी काँग्रेसवर फोडले. आपण केंद्रात मंत्री असताना मोठय़ा प्रमाणात विकासनिधी आणला. मात्र, कामांच्या उद्घाटनाचे नारळ काँग्रेस आमदारांनी फोडून श्रेय लाटल्याचा आरोप सूर्यकांता पाटील केला.
टोलचे आंदोलन म्हणजे तडजोडीचे आंदोलन असून, ते सुरू करून थांबवणे ही मनसेची नीती आहे. या पूर्वी राज ठाकरे यांनी सुरू केलेले टोलविरोधी आंदोलन थांबविताना कोणती तडजोड केली, असा उमेश पाटील यांनी सवाल केला.