रायगड जिल्हा प्रशासनाची कारवाई, किमान आठ दिवस कारवाई चालणार

पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटय़वधींचा चुना लावून फरार झालेल्या डायमंड किंग नीरव मोदी याच्या अलिबाग तालुक्यातील किहीम येथील अनधिकृत बंगल्यावर आज अखेर हातोडा पडला. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी आणि प्रांताधिकारी शारदा पोवार यांच्या उपस्थितीत ही कारवाई सुरू झाली असून ती पुढे किमान ८ ते १० दिवस चालणार आहे.

सक्तवसुली संचालनालयाने या बंगल्याचा ताबा रायगड जिल्हा प्रशासनाकडे दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. किहीम समुद्रकिनारी ७० गुंठे जागेत जवळपास ३० हजार चौरस फुटांचे बंगल्याचे बांधकाम आहे. नीरव मोदी फरार घोषित झाल्यानंतर ही मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने जप्त केला होता. अलिबागेतील अनधिकृत बांधकामांसदर्भात उच्च न्यायालयात दाखल याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला फटकारले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पुनर्वलिोकन करून हा बंगला महाराष्ट्र नगर विकास संरक्षण अधिनियमांचे उल्लंघन करून बांधण्यात आला असल्याचा अहवाल देत त्यावर कारवाई करावी, असे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले होते. परंतु ही मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाच्या ताब्यात असल्याने त्यासाठी त्यांची मान्यता हवी होती. याबाबत ईडीने निर्णय घ्यावा असेही न्यायालयाने सुचवले होते.

त्यानुसार दोन दिवसांपूर्वीच ईडीने या बंगल्यातील सामान हलवले असून काल गुरुवारी तो रायगड जिल्हा प्रशासनाकडे हस्तांतरित केला. त्यानंतर रायगड जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी बंगला पाडण्याबाबत हालचाली सुरू केल्या. आज सकाळपासूनच महसूल विभागाचे बांधकाम विभागाचे अधिकारी, पोलीस यांची धावपळ सुरू झाली. अखेर सायंकाळी ४ वाजता स्वत जिल्हाधिकारी सूर्यवंशी दाखल झाले आणि जेसीबीच्या सहाययाने बंगल्यावर कारवाई सुरू करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे हेदेखील उपस्थित होते.

मागील काही दिवसांपासून उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर अलिबाग तालुक्यातील अनधिकृत बांधकामांवर प्रशासनाने कारवाई सुरू केली होती. महत्त्वाचे म्हणजे कारवाई झालेले सर्व स्थानिक होते. दुसरीकडे नीरव मोदी याच्या बंगल्यावर कारवाई होत नव्हती. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण होते. आज हे बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली आणि संभ्रम दूर झाला असल्याचे दिसून आले.

‘बंगल्याचे बांधकाम मजबूत कॉंक्रीटचे आहे. हे बांधकाम मोठे म्हणजे ३० हजार चौरस फुटांचे आहे. त्यासाठी जेसीबी पोकलेन व इतर यंत्र मागवण्यात आली आहेत. तरीदेखील हे बांधकाम पूर्णपणे पाडण्यास किमान ८ ते १० दिवस लागतील. हे काम लवकर पूर्ण व्हावे, यासाठी तज्ज्ञांचा सल्लादेखील आम्ही आहोत.’   – डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी रायगड