महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा तपास आवश्यकता भासल्यास सीबीआयकडे सोपविण्याचा विचार करू असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वचनपूर्ती यात्रेसाठी ते नागपुरात दाखल झाले असता पत्रकारांशी बोलत होते.
या प्रकरणाचा तपास पुणे पोलीस योग्य दिशेने करत आहेत. परंतु, तरीही त्यांच्या हाती काही लागत नाही असे वाटल्यास या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा विचार करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी दाभोळकरांच्या हत्येच्या तपासाबाबत मुख्यमंत्री सीबीआयकडे तपास सोपविण्याची आवश्यकता नसल्याचे मत व्यक्त केले होते. मात्र, आता पुणे पोलिसांना तब्बल महिनाभर तपास करूनही काहीच हाती लागत नसल्याचे दिसल्यावर मुख्यमंत्र्यांची ही पहिलीच प्रतिक्रिया आली आहे.