भिवंडीत एका गोविंदाचा मृत्यू, १०६ जखमी

२० फुटांहून अधिक उंच दहीहंडय़ा, मद्यपी गोविंदांचा धिंगाणा

पथकांच्या स्वैरसंचारामुळे वाहतुकीचे तीनतेरा, पोलिसांची बघ्याची भूमिका

 

मुंबईमध्ये ध्वनिप्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून कानठळ्या बसविणाऱ्या डीजेच्या तालावर थिरकत वाहतुकीचा खोळंबा करीत तमाम गोविंदा पथकांतील १२ वर्षांखालील मुलांनी २० फुटांपेक्षा अधिक उंच दहीहंडी फोडून न्यायालयाच्या आदेशांची पायमल्ली केली. इतकेच नव्हे, तर महिलांना शरमेने मान खाली घालावी लागेल अशी कृत्ये करीत काही पथकांतील गोविंदा मद्याच्या अमलात गोंधळ घालत फिरत होते. गोविंदांचा हा धिंगाणा सुरू असताना पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. त्यातच भिवंडीमध्ये गणेश पाटील या गोविंदाचा दहीहंडी बांधताना झालेला मृत्यू या सणाला गालबोट लागण्यास कारणीभूत ठरला. सायंकाळपर्यंत मुंबई परिसरात तब्बल १०६ गोविंदा जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

दहीहंडीची उंची २० फूट असावी, १२ वर्षांखालील मुलांचा थरात सहभाग नसावा, १२ ते १५ वयोगटांतील मुलांच्या पालकांकडून लेखी परवानगी घ्यावी, आयोजकांनी गोविंदांना सुरक्षेची उपकरणे द्यावी, दहीहंडीखाली गाद्या पसरवाव्यात असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. या आदेशांनुसार राज्य सरकारने दहीहंडी उत्सवाबाबतचे धोरण निश्चित केले होते. मात्र त्यामध्ये दहीहंडीच्या उंचीबाबतचा उल्लेख टाळण्यात आला होता. परिणामी गोविंदा पथकांमध्ये उत्सवाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. या संभ्रमामुळे अनेक गोविंदा पथकांनी घरी बसणे पसंत केले, तर न्यायालयाच्या भीतीमुळे अनेक आयोजकांनीही उत्सवातून काढता पाय घेतला होता. त्यामुळे उत्सवातील उन्माद गेल्या वर्षीच्या तुलनेत काही अंशी कमी होता.

न्यायालयाने पाच थरांची मर्यादा घातलेली असताना अनेक स्थानिक मंडळे तसेच राजकीय नेत्यांच्या दहीहंडी उत्सवात सहा, सात आणि आठ थर रचून सलामी दिली जात होती. सर्वात वरच्या थरांमध्ये १२ वर्षांची मुलेही सहभागी होत होती. अनेक ठिकाणी आयोजकांनी रस्त्यामध्येच दहीहंडी बांधल्यामुळे वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला होता. वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून एका दुचाकीवर तीन-चार गोविंदा स्वार होऊन स्वैरसंचार करीत होते. रस्त्यात मध्येच बसगाडय़ा, ट्रक, जीप आणि दुचाकी वाहने अस्ताव्यस्त उभी केल्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत होता.

 

मराठवाडय़ात दहीहंडीवर दुष्काळाचे सावट

औरंगाबाद : मराठवाडय़ात या वर्षीच्या दहीहंडी उत्सवावर दुष्काळाचे सावट असल्याचे चित्र होते. औरंगाबाद शहरात प्रमुख राजकीय नेत्यांनी दहीहंडी न उभारण्याचा निर्णय घेतला. यात शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट, भाजपचे किशनचंद तनवाणी यांचा समावेश होता. यामुळे शहराच्या काही भागांत दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला. मात्र त्यात वारेमाप पाण्याची उधळण झाल्याचेही दिसून आले नाही.  औरंगाबाद शहरातील टीव्ही सेंटर भागात दहीहंडी उभारली होती. बहुतांश गोविंद पथके सायंकाळी कोठे दहीहंडी आहे का, याचा शोध घेत होती. मराठवाडय़ातल्या अन्य शहरांतही पाणीटंचाईमुळे दहीहंडी होऊ शकली नाही. नांदेड शहरातही या वर्षी फारसा उत्साह नव्हता. लातूर व उस्मानाबाद या शहरांतही पाणीटंचाईमुळे एखादा कार्यक्रम एवढेच दहीहंडीचे स्वरूप मर्यादित होते.

 

ठाण्यात सेनेकडून नियम धाब्यावर

ठाणे : टेंभी नाका, जांभळी नाका, रघुनाथ नगर यांसारख्या भागांत शिवसेना नेत्यांनी रस्ते अडवून मंडप तर उभारलेच, शिवाय शांतता क्षेत्रात ध्वनिक्षेपकांचा ढणढणाटही केला. राज्यावर दुष्काळाचे सावट असताना पालकमंत्री एकनाथ िशदे यांच्या उपस्थितीतच गोिवदा पथकांवर पाण्याचे फवारे उडविले गेले, तर ध्वनिक्षेपकांच्या आवाजाची मर्यादाही पायदळी तुडवली गेली.

 

कल्याण-डोंबिवलीतही कोंडी

कल्याण : कल्याण, डोंबिवलीत भाजप, शिवसेना, मनसे आणि काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी भर रस्त्यात दहीहंडय़ा बांधून वाहतूक कोंडीत भर घातली. भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी बाजीप्रभू चौक, मनसेचे शहराध्यक्ष राजेश कदम यांनी चार रस्त्यावर, कल्याणमध्ये भाजप, शिवसेनेने सहजानंद चौक आणि शिवाजी चौक अडवून कोंडी केली.