अंध, अपंगांच्या कल्याणकारी योजनांचा राज्य व केंद्र सरकारकडून डांगोरा पिटला जात असताना, जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अंधाधुंद कारभारामुळे एका अंध शिक्षकावर न्यायासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. भोकरच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्याकडून त्याच्याबाबत अन्याय व पक्षपातीपणा झाला आहे.
केंद्र सरकार पुरस्कृत अपंग समावेशित शिक्षण योजनेत किनवट तालुक्यातील बोधडीच्या जि. प. हायस्कूलच्या युनिटमधील शंकर राजेंद्र संगेवार (कुंटूर, तालुका नायगाव) या शिक्षकाची ही कैफियत. या शाळेतील अपंग समावेशित शिक्षण केंद्राची मान्यता मोकले नामक अधिकाऱ्याच्या अहवालामुळे रद्द झाल्याचे समोर येत आहे. मान्यता रद्द केल्याचा आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने १७ मे रोजी काढल्यानंतर संगेवार व त्यांचा परिवार, तसेच ते ज्या अंध विद्यार्थ्यांचा सांभाळ करून त्यांना शिकवत होते, ते सारे सैरभैर, हताश झाल्याचे दिसून आले.
मधल्या काळात या अंध शिक्षकाने थकित पगारासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबिला. त्यानंतर शिक्षण विभागाने कागदी घोडे नाचवले. पण आता पगार नाही व केंद्रही बंद झाल्याने संगेवार यांच्यावर शिक्षण विभागाचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे. एका जबाबदार व्यक्तीकडे विचारणा केली असता, संगेवार यांच्यावर अन्याय झाल्याचे त्याने मान्य केले. पण शिक्षण विभागातील अधिकारी हा अन्याय दूर करण्याबाबत लक्ष घालायला तयार नाहीत.
‘पात्र-अपात्र’तेतही दुजाभाव!
संगेवार पात्र शिक्षक आहेत. असे असताना त्यांचे केंद्र बंद करण्याची शिफारस करून अधिकाऱ्यांनी दुसऱ्या एका अपात्र शिक्षकाच्या केंद्राची मान्यता कायम ठेवण्याची दक्षता घेतली आहे. या शिक्षकाने निर्धारित मुदतीत बी. एड. अभ्यासक्रम पूर्ण केला नाही. असे असताना त्याच्याबाबतीत औदार्य दाखविण्याचा चमत्कारिक प्रकार समोर आल्यानंतर हा विषय थेट शिक्षण संचालनालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आला आहे.
गेल्या १२ वर्षांपासून सुरळीत चालू होते. ग्रामीण भागातील अंध विद्यार्थ्यांना एकत्र आणून त्यांनी आजवर दीडशेहून अधिक अंध विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची पायरी चढण्याची संधी मिळवून दिली. परंतु २५ नोव्हेंबर २०१३ हा दिवस त्यांच्यासाठी प्रतिकूल ठरला. तपासणीस आलेल्या अधिकाऱ्याला आवश्यक कागदपत्रे दिल्यावरही संगेवार यांच्या केंद्रात त्रुटी दाखविल्या गेल्या. त्यांना कोणतीही संधी न देता केंद्र बंद करण्याची शिफारस झाली. संगेवार यांच्या दप्तरी असलेली कागदपत्रे पाहिल्यानंतर त्यांच्या केंद्राची फेर पडताळणी होण्याची गरज आहे.
‘अध्यक्षांनीच आता वाचा फोडावी’!
हा अंध शिक्षक वजनदार नेत्याच्या गावचा असूनही राजकीय-प्रशासकीय पातळीवर त्याचा कोणी वाली नाही, कोणाचा आधार नाही. पत्नी व मुलगा या दोघांना सोबत घेऊन त्याची न्यायासाठी वणवण सुरू आहे. जि. प. अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर राजकारणी असले, तरी हाडाचे शिक्षक आहेत. त्यांच्या शाळेच्या नावात ‘आदर्श’ शब्द असल्याने एका अंध शिक्षकावर झालेल्या (२० महिन्यांपासून त्याला पगारही मिळाला नाही) अन्यायात लक्ष घालून समाजापुढे त्यांनी चांगला आदर्श घालून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.