देशाच्या राजधानीत दिल्लीत घटना घडताच संसदेत आवाज उठला, पण ग्रामीण भागात घडणाऱ्या बलात्काराच्या घटनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याची खंत सावंतवाडी नगरपालिकेच्या महिला नगरसेवकांनी करून महिलावर अत्याचार करणाऱ्यांना फाशी देण्याची मागणी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, दिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दीक्षित यांना आमच्या भावना कळवा असे निवेदन प्रांताधिकारी यांना नगरपरिषदेच्या नऊ महिला नगरसेविकेनी दिले.
नगरसेविका योगीता मिशाळ, वैशाली पटेकर, आनारोजीन लोबो, साथी कुडतरकर, कीर्ती बोंद्रे, शुभांगी सुकी, अफरोज राजगुरू, क्षिता सावंत व शर्वरी धारगळकर या नगरसेवकांनी निवेदन दिले.
दिल्लीत सार्वजनिक बसमध्ये युवतीवर अत्याचार करणाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा द्यावी, अशी मागणी करून संसदेत दोन्ही सभागृहांत मागणी करण्यात आली. त्याला दुजोरा देत आहोत असे निवेदनात म्हटले आहे. महिलांचे जीवन दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. देशाच्या राजधानीत बलात्काराच्या अनेक घटना घडत आहेत ही बाब अत्यंत लांछनास्पद आहे, असे या निवेदनात म्हटले असून, देशात महिलांवर अत्याचार होण्याचे निंदनीय प्रकार वाढल्याचे म्हटले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात गेल्या पाच वर्षांत महिलांच्या अपहरण, अत्याचार आणि खुनाच्या बऱ्याच घटना घडलेल्या असून, गुन्हेगारांचा तपास लावण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे. या घटनांबाबत योग्य पाठपुरावा झालाच पाहिजे. शहरात रोडरोमीओंकडून मुलीची होणारी छेडछाड, भररस्त्यात विनयभंगाच्या घटना, महिलांना एकाकी गाठून त्यांना लज्जास्पद बोलणे, फुस लावणे, पळवून नेणे, मंगळसूत्र चोरी आदी सर्व प्रकारांना आळा बसलाच पाहिजे, अशी मागणी केली आहे.