माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतीश चतुर्वेदी यांनी ‘हनुमान सेना’ नावाने एक अराजकीय संघटना स्थापन करून समाजातील प्रश्न सोडवण्याचा विडा उचलला आहे. ‘हनुमान सेना’ ही अराजकीय आणि सामाजिक संघटना असून अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी स्थापन करण्यात आल्याचे चतुर्वेदी यांनी स्पष्ट केले आहे. वाढती गुंडगिरी, महिलांवर अत्याचारात झालेली वाढ आणि त्यांना संरक्षण देण्यासाठी हनुमान सेना लढा देणार आहे.
पूर्व नागपुरातून पाचवेळा विधानसभेवर निवडून आलेल्या सतीश चतुर्वेदी यांना २००९ मधील विधानसभा निवडणुकीत त्यांचेच एकेकाळचे कट्टर समर्थक कृष्णा खोपडे यांच्याकडून अपमानास्पद पराभव पत्करावा लागला होता. तेव्हापासून सतीश चतुर्वेदी राजकीय विजनवासात गेल्यासारखे आहेत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी हलक्या स्वरात बोलताना काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मिरवणुकीसाठी कोटय़वधी रुपयांचा निधी गोळा केल्याचे चतुर्वेदींचे वक्तव्य एका वृत्तवाहिनीच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले होते. या ‘स्टिंग ऑपरेशन’मुळे चतुर्वेदी वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. गेल्या महिन्यात चतुर्वेदी त्यांनी महात्मा गांधी यांच्यावर केलेल्या पीएच.डी. प्रबंधामुळे चतुर्वेदी एकदम प्रकाशझोतात आले होते.
आता त्यांनी ‘हनुमान सेना’ स्थापन करून पुन्हा सक्रिय होण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्याशी संपर्क साधला असता ‘हनुमान सेना’ हा काही राजकीय पक्ष नसून हनुमानाने जसा दुष्टांचा नाश केला तसा समाजातील वाईट बाबींचा, महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात हनुमान सेना काम करणार असून हिंदुत्वाशी या संघटनेचा काहीही संबंध नाही. यासाठी काँग्रेस पक्षाची परवानगी मागितली नसून संघटनेला काँग्रेसचा विरोध नाही. हिंदुत्व ही काही वाईट गोष्ट नसून महात्मा गांधी यांचे शेवटचे शब्द ‘हे राम’ असल्याची आठवण करून देतानाच महात्मा गांधींना अपेक्षित असलेल्या रामराज्याचाही चतुर्वेदी यांनी उल्लेख केला. आपण हिंदुत्वाशी फटकून वागणे म्हणजे जनतेशी संबंध तोडणे होय, अशी टिप्पणी त्यांनी केली.
हनुमान सेनेच्या अभिषेक यात्रा चतुर्वेदींचा मतदारसंघ पूर्व नागपुरात काढण्यात आली. चतुर्वेदी संचालित हनुमानसेनेतर्फे भवानी पारडी मंदिरातून ही यात्रा काढण्यात आली. त्यावेळी हनुमानाचा मोठा रथ, मंगल कलश डोक्यावर घेतलेल्या महिला, फटाक्यांची आतषबाजी तसेच ढोल-ताशांच्या गजरात असलेल्या या अभिषेक यात्रेने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. या यात्रेत अनेक नागरिक सहभागी झाले होते. यात्रेवर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. तत्त्पूर्वी पारडी भवानी मंदिरात सतीश चतुर्वेदी यांनी अभिषेक यात्रेला हिरवा झेंडा दाखवला.