करोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक कार्यक्रमासह यात्रा, उरूस साजरे करण्यासाठी मनाई असताना बुधवारी हनुमान जयंतीवेळी पालखी मिरवणूक काढल्याप्रकरणी मिरज तालुक्यातील शिपूर या गावी २० जणांना अटक करण्यात आली. शहरासह जिल्हयात सर्वत्र साधेपणाने आज सूर्योदयावेळी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

शिपूर येथे प्रथेप्रमाणे सूर्योदयावेळी हनुमानाचा जन्मकाळ साजरा करण्यात आला. दरवर्षी हनुमानजयंती पासून मारूती मंदिरामध्ये पारायण सोहळा साजरा करण्याची प्रथा आहे. यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर सोहळे साजरे करण्यास मनाई करण्यात आली असतानाही बंदी हुकुम डावलून काही जणांनी पालखी मिरवणूक काढली.

याची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी हस्तक्षेप करीत २० जणांविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. यामध्ये पोपट बाबर, शहाजी बाबर, सुशांत शिंदे, राजाराम शिंदे, संजय गुरव, रमेश देसाई, नंदकुमार बाबर, सयाजीराव सुर्यवंशी, आनंदा गुरव, बबन शिंदे, तात्यासो सुर्यवंशी, भारत चव्हाण, अरूण गुरव, सुरेश चव्हाण, धनाजी देसाई, राजकुमार बाबर, महादेव देसाई आदींचा समावेश आहे.

गावचे पोलीस पाटील आणि ग्रामीण पोलीसांनी सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यास मनाई करीत असताना असे कृत्य आढळल्यास कारवाईचा इशारा देणारी नोटीस बजावली असतानाही पालखी सोहळा आयोजित केल्याने अटकेची कारवाई करण्यात आली.

दरम्यान, सांगली मिरजेसह जिल्हयाच्या ग्रामीण भागात हुनमान जयंतीची औपचारिकता आज पूर्ण करण्यात आली. सांगली इस्लामपूर मार्गावरील तुंग येथे हनुमान जयंती सोहळ्याची सव्वाशे वर्षांची परंपरा या वेळी खंडित झाली असून या निमित्ताने भरणारी यात्राही रद्द करण्यात आली.