मंगलवाद्य सनई आणि तेही बनारसच्या रसिक भूमीमधून खास या पुण्यभूमीत अवतरले. संजीव शंकर आणि अश्विनी शंकर यांनी सर्वप्रथम राग मुलतानी अतिशय भावपूर्ण अंत:करणाने सादर केला. पूर्ण गायकी अंगाचे हे सादरीकरण अनेक ठिकाणी दाद देऊन गेले. काफी ठुमरी ही अतिशय नजाकतीने पेश केली. सहवादन हे किती प्रभावी व विविधतेने नटू शकते हे या ठुमरीवादनाने दाखवून दिले. गमक तसेच तंतकारीचे बहुतेक सर्व प्रकार खूपच सुंदर पेश केले. कायम स्मरणात राहील असे हे सहवादन श्रोत्यांची मोठी दाद देऊन गेले.
यानंतर स्वरमंचावर मीना फातर्पेकर यांचे आगमन झाले. त्या उस्ताद अब्दुल करीम खाँ यांच्या पणती आहेत. त्यांनी सादरीकरणासाठी राग खंबावती घेतला. ‘आली री मै जागी’ ही विलंबित एक तालातील प्रसिद्ध चिज सादरीकरणासाठी घेतली. हा सायंकालीन राग नसूनही स्वरांचे लगाव आलापीतील गमक, तसेच रागाला भाव परिपोष जपण्यास फातर्पेकर या नजाकतीने सादर करण्यात यशस्वी झाल्या आहेत, असे म्हणावेसे वाटते. तबल्यावर माधव मोडक यांची दमदार आश्वासक साथ हे गायन खुलवून गेले. अविनाश दिघे यांनी संवादिनीवर सुंदर साथ केली. ‘कैसे कैसे आवू।’ ही मध्य त्रितालातील चीज अधून-मधून गंगूबाई हनगळ यांच्या गायनातील अनेक जागा दाखवून गेली. शेवटी त्यांनी ‘आवो मारे घर प्रीतम’ हे संत मीराबाईंचे भजन पटदीप रागात भावपूर्णतेने सादर करून गायन संपविले.
  यानंतर प्रसिद्ध गायिका विदूषी पद्मा देशपांडे या आपले गायन सादर करण्यासाठी स्वरमंचावर आल्या. सर्वप्रथम यमन हा राग सादरीकरणासाठी त्यांनी निवडला. ‘य: मन:।’ म्हणजे ‘जसे मन,’ जसा मनाचा भाव, जशी मनाची भावावस्था असेल तसा तो दर्शवित खुलतो. या रागाचा वर्षांनुवर्षे रियाज, त्याचा सुस्पष्ट स्वर विचार, प्रयोगशीलता असेल तर विविध स्वरांचे नाते खूप चांगल्या प्रकारांनी या रागात दाखविता येते. विलंबित एकतालामधील ‘मोरा मन बाजे’ या चीजेत विविध बोल ताना, आक्रमक तान प्रक्रिया, रागांचे विविध पदर पद्माताई दाखवित होत्या. स्वरसंवादिनीवर पं. अरविंद थत्ते यांची अतिशय सुबक व चपखल साथ गायनाची रंगत वाढवत होती. तबल्यावर पं. माधव मोडक यांनी समर्पक साथ केली. याच रागात- तुम बीन अब कैसे जिवू। ही मध्य एकतालामधील गत नजाकतीने पेश केली. विलंबित चीज अजून थोडी विलंबित घेतली असती तर अजून श्रोत्यांना शांत रसाचा आनंद मिळाला असता. ‘श्याम रे। ही मध्य एकतालामधील बंदिश समूह स्वरूपात छान सादर केली.
खेलत तो आवो ब्रीजलाला ही काफीमधील अध्धा त्रितालामधील बंदिशही दाद देऊन गेली. रूप बलि तो नरशार्दुल या माणिकताईंच्या नाटय़गीताची आठवण यानिमित्त झाली. शेवट अमृताहूनी गोड नाम तुझे देवा। हे माणिकताईंनी चिरपरिचित केलेले भक्तिगीत पेश केले. पद्माताईंचा अनुनासिक स्वर, तसेच गळ्यामध्ये तानांची फिरक आणि प्रचंड आत्मविश्वास आपला वेगळा ठसा उमटवून जातातच. याचा पुन्हा प्रत्यय आला. संतश्रेष्ठ ज्ञानोबांचा संजीवन समाधी वर्धापन सोहळा नुकताच पार पडला. अगदी लगोलग हे गाणे ऐकावयास मिळावे, हे भक्तिमय वातावरण लाभावे, हे श्रोत्यांचे भाग्य म्हणावे लागेल.
 संतूर-‘शततारी वीणा’, ज्याची श्रोते अत्यंत उत्सुकतेने वाट पाहात होते ते ऐकण्याचा क्षण जवळ आला. बसल्या जागेवर काश्मीरच्या शुभ्र धवल बर्फाळ प्रदेशात, पृथ्वीवरच्या नंदनवनात फिरवून आणणारे हे वाद्य. सौंदर्याचा मानबिंदू सर्वानाच आवडते. या शब्दाच्या पलीकडे वर्णन करणाऱ्या वाद्यावर फिरणारा हात मात्र तसाच सौंदर्यपूर्ण असावा लागतो. यावर्षी पं. राहुल शर्मा हे पं. शिवकुमार शर्मा यांचे सुपुत्र अनोखे नादतरंग वाद्य घेऊन स्वरमंचावर अवतीर्ण झाले. सर्व प्रथम त्यांनी राग कलावती सादरीकरणासाठी घेतला. अत्यंत धीम्या गतीने आलापी नव्हे तर मयूराचा नजाकतीने आपला विस्तृत पिसारा पसरवून पदन्यास नखरेलपणे सुरू केला. निसर्गाचे देखणे सौंदर्य, त्याची आभा, श्रोत्यांच्या नजरेसमोर आणण्याचे मोठे कसब या कलाकाराने मोठय़ा कष्टाने कमावले आहे. तंतकारी, अतिशय सुस्पष्ट, वैविध्याचा उच्चांक या कलाकाराने गाठला. त्यामुळेच त्यांच्या वादनाला एक ‘जान’ आली होती. रूपक तालामध्ये कलावतीमधील ही गत चांगली रंगली. तबल्यावर सत्यजित तळवलकर यांनी सुरेख, वजनदार साथ केली. लयकारीचे अनेक प्रकार खूप सुंदरपणे पेश केले. या वीणेवरील ताना आनंदाचे तरंग निर्माण करत होत्या.
संत तुकोबाच्या शब्दात ‘आनंदाचे डोही। आनंद तरंग।।’ श्रोते या स्वरवर्षांवांनी पहिल्याच दिवशी चिंब भिजून गेले होते. ळ६ ्र२ ूेस्र्ंल्ल८ ३ँ१ी ्र२ ू१६ी ि ही इंग्रजी म्हण संतूर व तबल्याच्या गेले तास-दीड तास चाललेल्या लयकारीमधून खरी ठरत होती. एवढे हजारो श्रोते असूनही हा ू१६ िया स्वरामध्ये एकरूप घेऊन गेला होता. विरघळून गेला होता, हे या कलाकाराचे महान यश आहे.
  या स्वरमहोत्सवाचे आजचे अंतिम पुष्प पं. जसराज यांनी गुंफले. शुद्ध नट रागातील चीज सर्वप्रथम सादरीकरणासाठी घेतली. विलंबित एकतालात दमदार धीरगंभीर आलापींनी हा अनवट राग प्रकट होऊ लागला. नट-भैरव नट-बिहाग, नटनारायण असा कायम कुठल्या तरी रागाच्या जोडीने ऐकू येणारा राग आज स्वतंत्र ऐकावयास मिळाला. पंडितजींची गायकी म्हणजे शिस्तीचा उत्तम सादरीकरणाचा वस्तुपाठच असतो. खर्ज षड्जापर्यंत जाणारे टपोरे दाणेदार स्वर हे फार थोडे कलाकार दाखवितात. त्यापैकीच एक पं. जसराज होत. तिन्ही सप्तकात फिरणाऱ्या दमदार ताना आणि राग गायनामधील गोडवा कायम ठेवणारा ‘भगवान की देन’ लाभलेला स्वर ऐकणे हे खरेच भाग्याचे लक्षण आहे आणि हे भाग्य पुणेकरांना प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी लाभले आहे पंडितजींच्या आजच्या या गायनामधून.
  पंडितजींना स्वरसंवादिनीवरची साथ पं. मुकुंद पेटकर या नैसर्गिक हाताला गोडवा लाभलेल्या कलाकाराची ऐकण्यासारखी होती. ‘डोले रे मन’ ही मध्य त्रितालातील बंदिश गमक मिंड खटक्या, मुरक्या, सरगम, बोल ताना.. सर्वागाने पेश केली.
तबला साथ पं. रामकुमार मिश्रा यांनी चपखलपणे सादर केली. कार्यक्रमाचे समापन आदि शंकराचार्याच्या ‘मधुराष्टकम’ ने भावपूर्ण अंत:करणाने सादर झाले. सर्व स्वरसोहळ्याचा तो माधव हाच आदी व अंतिम उद्देश आहे. तोच माधव अंतिम गंतव्य, तसेच श्रेय आहे. त्या मधुकराचे मधूर काव्य पंडितजींनी आपल्या मधूर स्वराने केले हाच अत्युच्च आनंदाचा बिंदू हाच खरा लाभ श्रोत्यांना मिळाला.