जहाल नक्षलवादी आणि माजी दलम कमांडर गोपी उर्फ निरींगसाय दरबारी मडावी याने सोमवारी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले. तो कोरची दलम मध्ये कार्यरत होता. या नक्षलवाद्यावर १२ लाख रुपयांचे इनाम होते. त्याच्या आत्मसमर्पणामुळे चळवळीला मोठा हादरा बसला आहे. गेल्या दोन वर्षांत ७३ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
गडचिरोलीत कमांडर गोपीने पोलिसांना सळो की पळो करून सोडले होते. त्याने आत्मसमर्पण करावे म्हणून गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांनी अथक प्रयत्न चालविले होते. गेल्या आठवडय़ात या प्रयत्नांना यश आले. गोपीचे आत्मसमर्पण हा नक्षल चळवळीला मोठा धक्का असून गडचिरोली पोलिसांचे आजवरचे हे सर्वात मोठे यश मानले जात आहे.
गोपीचा नागलडोह, डोंगरगांव, मरकुटी, लेकुरबोडी, पडीयाजोब, फुलगोंदी, लव्हिवी, हेटळकसा या आठ चकमकीत प्रत्यक्ष भाग होता. अनेक पोलिसांनाही त्याने चकमकीत ठार केले आहे.