आंबा, काजूचा हंगाम असल्याने ग्रामीण भागात प्रचारासाठी जाणाऱ्या राजकीय लोकांना सध्या सभेसाठी गर्दी खेचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे बोलले जात आहे. ग्रामीण भागात आंबा, काजू, कोकम तसेच भाजीपाला बागायतीत लोकांचा वावर आहे. अगोदरच निसर्गाच्या बदलत्या रूपाने आणि वन्य प्राण्यांच्या त्रासाने हैराण झालेले बागायतदार चिंताग्रस्त बनले आहेत. ग्रामीण भागात काजू हंगामामुळे लोक भेटत नसल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच दिवसा हवामानातील उष्णतेचे प्रमाण वाढल्याने लोक हैराण झाले आहेत. बदलत्या हवामानाचा फटका फळ व भाजीपाला बागायतींना बसला आहे. तसाच तो लोकांनाही बसला असल्याने रुग्णालयात गर्दी वाढली आहे. लोकसभा निवडणुकीचे वातावरण पत्रके वाटण्यापुरतेच मर्यादित आहे. आचारसंहितेमुळे स्पीकरचा आवाज नाही आणि ऊठसूट बॅनर्सयुद्धही नाही. त्यामुळे निवडणुकीचे चित्र सामसूम दिसत आहे.
लोकांना प्रचंड महागाईचे चटकेही बसत आहेत. त्यामुळे राजकीय सभांना उत्स्फूर्त गर्दी दिसत नसल्याचे बोलले जात आहे.