16 February 2019

News Flash

मुंबईकडे जाणारे दूध रोखण्यास हार्दिक पटेलचा पाठिंबा

कार्यकर्त्यांना छळण्यास सुरुवात केल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला.

गुजरातमधील पटेल आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल

स्वाभिमानी शेतकरी संघटना दूध दरवाढीकरिता सोमवारपासून मुंबईकडे जाणारे दूध रोखणार असून, या आंदोलनाला गुजरातच्या हार्दिक पटेल यांनी पाठिंबा दिला आहे. आंदोलन दडपण्यासाठी राज्य सरकारने पोलिसांना हाताशी धरून कार्यकर्त्यांना छळण्यास सुरुवात केल्याचा आरोप संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केला.

दूध आंदोलनाच्या तयारीसाठी आज कारेगाव (ता. श्रीरामपूर) येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याला भर पावसातही मोठा प्रतिसाद मिळाला. या वेळी खासदार शेट्टी यांनी सरकारकडून फोन टॅपिंग होत असल्याचाही आरोप केला. या वेळी ज्येष्ठ नेते दशरथ सावंत, घनश्याम चौधरी, माणिक कदम, देवेंद्र भोयर, हंसराज वडगुले, अंबादास कोरडे, अशोक ढगे, जितेंद्र भोसले, प्रताप पटारे, रवींद्र मोरे, सुभाष पटारे, सुरेश ताके आदी उपस्थित होते.

अकरा वर्षांपूर्वी दुधाचे आंदोलन केले, त्या वेळी संघटना केवळ कोल्हापूर व सांगलीपुरती मर्यादित होती. तरीदेखील मुंबईला जाणारे दूध रोखण्यात आले. अखेर मुख्यमंत्र्यांनी चर्चेचे निमंत्रण देऊन दूध दरवाढ जाहीर केली. आता संघटनेची राज्यात ताकद वाढली असून, देशातील अनेक शेतकरी संघटनांचा पाठिंबा असल्याचे शेट्टी म्हणाले. कर्नाटकचे एक थेंबही दूध राज्यात येऊ  दिले जाणार नाही. गुजरातमधून पोलीस बंदोबस्तात दूध आणण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला जाईल. पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला असून, मुंबईकडे येणारे दूध गुजरातमध्येच रोखण्याचे काम ते करणार आहेत. आंदोलनास राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याने राज्य सरकार हादरले आहे. पूर्वीचे गुन्हे दाखल असलेल्या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात बोलवून धमकावले जात आहे. रात्री कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे आंदोलनाची विचारपूस पोलीस करीत आहेत. आंदोलन कितीही दडपण्याचा प्रयत्न केला तरी मुंबईत एक थेंबही दूध जाऊ  देणार नाही. मुंबईकडे जाणाऱ्या तीनही महामार्गावरून एकही टँकर कार्यकर्ते जाऊ  देणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.

सुभाष पटारे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी दशरथ सावंत, माणिक कदम, घनश्याम चौधरी, प्रताप पटारे, अंबादास कोरडे, जितेंद्र भोसले, सुरेश ताके, अशोक ढगे, प्रकाश देठे, हंसराज वडगुले, दशरथ उंडे आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन आबा कुमावत यांनी केले. या वेळी बजरंग दरंदले, साहेबराव पटारे, लक्ष्मण भवार, मच्छिंद्र उंडे, भरत आसने, नितीन पटारे आदी उपस्थित होते.

महसूलमंत्र्यांना दूधप्रश्नाबाबत काही कळत नाही

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना गायी व म्हशीचे दूध कसे काढतात हेच माहीत नाही. एसएमपी म्हणजे काय हे ठाऊक नाही. त्यांना दूधधंद्यातील ‘ट’ का  ‘फ’ कळत नाही. ते आता दुधावर बोलत आहेत. त्यांना फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांनी किमान शेतकऱ्यांचा विश्वासघात तरी करू नये, असा सल्ला खासदार शेट्टी यांनी दिला.

First Published on July 13, 2018 1:01 am

Web Title: hardik patel milk movement