स्वच्छ सदरा, पायघोळ धोतर आणि तिरकी टोपी. माणूस मात्र कमालीचा सरळ. किती? तो काळ सहकारी बँकांवरून विश्वास कमी होण्याचा होता. माधवपुरा बँकेतून पसे काढण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या होत्या. देवगिरी बँकेतून गुंतवणूक काढावी, अशी अनेकांची मानसिकता होती. हेडगेवार रुग्णालयाची काही रक्कम अनामत म्हणून देवगिरी बँकेत ठेवली होती. ती काढून घ्यावी, असा विचार सुरू झाला तेव्हा ‘नाना’ आले. हवा तर माझा सात-बारा देतो, पण रक्कम काढू नका. संस्थेवर आपणच विश्वास वाढवायचा असतो, असे सांगून गेले. हे नाना म्हणजे हरिभाऊ बागडे. औरंगाबादकरांसाठी कमालीचे सरळ असणारे हरिभाऊ विधिमंडळात मात्र पहिल्याच दिवशी वादग्रस्त ठरले.
तसा हा माणूस कमालीचा निरलस.. त्यांच्यासमवेत काम करणारे दाजी जाधव सांगत होते. त्यांच्या कामामुळे अनेक चांगले बदल होत गेले. १९७२ च्या दुष्काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दुष्काळ विमोचन समिती नेमली होती. त्याचे प्रांत कार्यवाह म्हणून हरिभाऊ बागडे कामाला लागले. अनेक गावांत त्यांनी मोटारसायकलवर प्रवास केला. त्यानंतर ही समिती जनकल्याण समितीत परिवíतत झाली. आणीबाणीतही ते सक्रिय होते. नंतर सहकाराच्या वेगवेगळ्या प्रकल्पांत रमले. दूध आणि साखर या दोन्ही विषयांत त्यांना कमालीचा रस. विशेष म्हणजे दोन्ही संस्थांचा कारभार नावाजला जातो. एक शब्द वावगा न बोलता स्पष्टपणे नकार देण्याची धमक, हे त्यांचे गुणवैशिष्टय़ आवर्जून सांगतात.
त्यांच्या कार्यशैलीचे वर्णन करताना आबासाहेब देशपांडे म्हणतात, त्यांच्या राहणीमानात कधीच फरक पडला नाही. तसा हा माणूस कमालीचा प्रामाणिक. सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा कारभार मंत्री म्हणून सांभाळताना त्यांना अनेकवेळा प्रलोभने दाखविण्यात आली. भेटवस्तू येत. पण विनयाने आणि निश्चयाने ते नाकारत, हे आम्ही पाहिले आहे. या भागात त्यांनी पक्षबांधणीचे मोठे काम केले. अगदी बारीकसारीक बाबींमध्ये लक्ष घालण्याचा त्यांचा स्वभाव आहे. परिणामी त्यांच्या संस्थेतील अनेकांना त्याचा त्रासही वाटत असेल. पण नियोजनासाठी त्याची आवश्यकता असते. दूध आणि साखर या दोन्ही क्षेत्रांत ते या कारणामुळेच यशस्वी ठरले.
औरंगाबाद तालुक्यातील चितेिपपळगावची दूधडेअरी वा सहकारी साखर कारखाना असो, काटकसरीने या संस्था चालाव्यात असे त्यांचे प्रयत्न असतात. १९८०पर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघात ते जिल्हा शारीरिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्यावर दत्ताजी भाले यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मोठा प्रभाव आहे. दत्ताजी भाले हे संघाचे प्रचारक होते. त्यांच्या आठवणी सांगताना हरिभाऊ यांचे डोळे पाणावतात.
अर्थात, हरिभाऊंना विरोधक नाहीत, असे मात्र नाही. पक्षांतर्गत अनेकांशी त्यांचे पटत नाही. कमालीचा स्पष्टवक्तेपणा अनेकांना बोचतो. अलीकडच्या काळात त्यांचे कार्यकत्रेही जातीचे िरगण आखू लागल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. मात्र, त्यांच्या निष्ठांवर  कधीच प्रश्नचिन्ह लावता येणार नाहीत, हे आवर्जून सांगितले जाते. त्यांना मिळालेले पद त्याच निष्ठेचा भाग आहे.