कन्नड मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय शनिवारी मागे घेतला. कन्नड मतदारसंघात विकासकामांसाठी निधी मिळत नाही, तसेच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप करीत शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे मंगळवारी सुपूर्द केला होता. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पात विविध कामांसाठी निधीची तरतूद न झाल्यास राजीनामा देण्याचा इशारा जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला होता. त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा ठपका ठेवत हर्षवर्धन जाधव यांनी मंगळवारी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा देऊ केला होता. दरम्यान, जाधव यांचे राजीनामापत्र मिळाले असून ते राजीखुशीने दिले आहे काय, याची विचारणा पुन्हा एकदा करू आणि नंतर त्यावर निर्णय घेतला जाईल, असे विधानसभा अध्यक्ष बागडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले होते.
शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा