लोकसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात कोल्हापूर जिल्ह्यात अभावानेच फिरकलेले पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपले अपयश लपवताना निवडणुकीतील पराजयाचे खापर कार्यकर्त्यांवर फोडले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचारात आघाडी न घेतल्याने अपयश आले असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीत दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या ६८ व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सहकारमंत्री पाटील यांनी काँग्रेसचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थितीत कार्यकर्त्यांवरच हल्ला चढवला.
पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस कार्यकत्रे प्रचारात कमी पडल्याने विरोधकांनी याचा फायदा घेतला. विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना सुद्धा कमी पडल्याची खंत व्यक्त करत आगामी विधानसभा निवडणुकांत स्वबळावर लढायचं की एकत्र लढायचं याचा निर्णय  पक्षश्रेष्ठी घेतील असेही त्यांनी या वेळी सांगितले. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष स्वतंत्रपणे लढतील अशी चर्चा सुरू झाली आहे.