नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या गिधाडांना वाचविण्यासाठी राज्यात प्रथमच राबविलेल्या उपहारगृहाच्या प्रयोगाच्या यशस्वितेबद्दल वन्य जीव सप्ताहाचे औचित्य साधत व्याघ्रदूत अमिताभ बच्चन यांच्या हस्ते नाशिकच्या हरसूल वन परिमंडळ आणि संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना सन्मानित करण्यात आले.
मृत जनावरांचे भक्षण करणारा गिधाड पक्षी निसर्गात स्वच्छक म्हणून भूमिका बजावतो. यामुळे निसर्गाच्या अन्नसाखळीतील तो महत्वपूर्ण घटक मानला जातो. स्थानिक पातळीवर लांब चोचीचे व पांढऱ्या मानेच्या गिधाडांच्या प्रजाती आढळून येत असल्या तरी त्याही नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अंजनेरी, ब्रम्हगिरी, मुळेगाव, वरसविहीर, चांदवड, हरसूल, केळझर, ओझरखेड, ब्रम्हगिरी आणि पहिने या गावातील डोंगर कपारीत आणि जंगल परिसरात गिधाडांचे अस्तित्व सर्वेक्षणाद्वारे अधोरेखीत झाले. लुप्त होण्याच्या स्थितीत असलेली गिधाडांची घरटी तसेच त्यांचा आढळ असलेल्या ठिकाणांची माहिती घेऊन हरसूल तालुक्यातील मौजे खोरीपाडा येथे संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने राज्यातील पहिले गिधाडांसाठी उपहारगृह अस्तित्वात आले. अर्धा एकर जागेत संरक्षक जाळी बसविण्यात आली. या ठिकाणी गिधाडांना पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी पाण्याचे हौद बांधण्यात आले. या केंद्रात हरसुल परिसरातील शेतकऱ्यांमार्फत मृत जनावरे गिधाडांसाठी खाद्य म्हणुन टाकले जाते. एकाच ठिकाणी भक्ष्य व पिण्याचे पाणी उपलब्ध होत असल्याने परिसरात गिधाडाची संख्या वाढली आहे. येथील मोजी खोरीपाडा गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समितीने उपहार गृहाच्या देखरेख, स्वच्छता व संरक्षणाची जबाबदारी स्विकारली. तसेच उपहार गृहात टाकल्या जाणाऱ्या मृत जनावरांची तपासणी समितीच्या सदस्यांकडून केली जाते.
समितीच्या या उपक्रमाची यशस्वीता लक्षात घेऊन वन विभागाने वन्यजीव संरक्षण व नियोजन तसेच संयुक्त वन व्यवस्थापन समिती अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या वन विभागासाठी आयोजित पुरस्कार सोहळ्यात मुंबई येथे व्याघ्रदूत अमिताभ बच्चन यांच्या हस्ते हरसुल वन परिमंडळ अधिकारी काशिनाथ वाघेरे, संयुक्त वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंकर शिंदे यांना सन्मानित करण्यात आले.
समितीला याबाबत उपवनसंरक्षक पश्चिम भाग अनिता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.