मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आज साजरा होत असताना, भाजपा त्याला अपशकुन करत आहे. त्यांच्या कामाचे कौतुक राहू द्या, किमान अपशकुन तरी करू नका. अशा शब्दात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी भाजपावर निशाणा साधला.

मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी प्रशासनाचा फारसा अनुभव नसताना, त्यांनी कमी वेळेत करोनासारख्या महामारीवर मोठ्याप्रमाणात नियंत्रण मिळवले. असे असताना आज त्यांच्या जन्मदिनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या संयमी, सुसंस्कृत, प्रांजळ स्वभावाचे कौतुक व्हायला हवे होते. मात्र, कौतुक राहिले बाजूलाच उलट त्यांच्यावर तोंडसुख घेऊन त्यांना अपशकुन घडवण्यासाठी भाजपाने कार्यकारिणीची बैठक बोलावली. त्यांच्या या घाणेरड्या प्रयत्नाबद्दल आपण निषेध व्यक्त करत आहोत, असेही हसन मुश्रीफ म्हणाले.

आणखी वाचा- “रिक्षाचं स्टिअरिंग उद्धव ठाकरेंच्या हाती, मात्र कुठे जायचं हे मागे बसलेले ठरवतात”

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे, आम्ही महाराष्ट्रातील सरकार पाडणार नाही तर महाविकास आघाडीतील पक्षांच्या अंतर्गत विरोधामुळेच सरकार पडेल, असा दावा करतात. असे असेल तर मग फडणवीस यांनी शांत राहून आमच्यातील अंतर्गत विरोधामुळे सरकार पडायची वाट तर पहावी. किमान एवढा तरी शहाणपणा शिल्लक ठेवावा, असा खोचक टोला देखील मुश्रीफ यांनी यावेळी लगावला.