News Flash

“केंद्राला साष्टांग नमस्कार करतो, पण…!” ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा भाजपावर निशाणा!

उच्च न्यायालयात यासंदर्भात जनहित याचिका दाखल झाल्याचं देखील हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

राज्यात करोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढू लागले आहेत. मात्र, त्याचवेळी ऑक्सिजन, रेमडेसिविर, बेड या गोष्टींची कमतरता जाणवू लागली आहे. ऑक्सिजनअभावी काही ठिकाणी रुग्ण दगावल्याचीही घटना घडली आहे. रेमडेसिविरचा काळा बाजार सुरू असल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात रेमडेसिविरच्या पुरवठ्यावरून राजकीय वाद देखील रंगू लागला आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रेमडेसिविरच्या पुरवठ्यावरून निशाणा साधला आहे. कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, रेमडेसिविर भाजपाच्याच नेत्यांना कसे मिळतात? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

उच्च न्यायालायात जनहित याचिका

दरम्यान, भाजपाचे नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी हिमाचल प्रदेशहून रेमडेसिविर आणल्याचा देखील उल्लेख हसन मुश्रीफ यांनी यावेळी केला. “खासदार सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र घेतलं. रेमडेसिविर इंजेक्शन आणण्यासाठी त्यांनी पत्र मिळवलं. हिमाचल प्रदेशमधून त्यांनी २ हजार रेमडेसिविर इंजेक्शन मिळवले. केंद्र सरकारचं नियंत्रण असताना हे इंजेक्शन त्यांना कसे मिळाले? त्यांनी प्रशासनाला ते द्यायला हवे होते. त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते त्याचं वाटप कसं केलं? त्या रेमडेसिविरची शुद्धता तपासली गेली का? अशी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. २९ एप्रिल रोजी त्यावर सुनावणी होणार आहे”, असं मुश्रीफ यांनी सांगितलं.

इंजेक्शन भाजपालाच द्यायचं ठरवलंय का?

यावेळी बोलताना हसन मुश्रीफ यांनी भाजपावर टीका केली आहे. “वास्तविक हे इंजेक्शन भाजपालाच कसे मिळाले? राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड हे दीव दमणला जातात आणि त्या कंपनीला भेटतात. ५० हजार इंजेक्शन त्यांना मिळतात. त्याचे पैसे भाजपा द्यायला तयार होतो. सुजय विखे पाटील विमानाने जातात. त्यांना इंजेक्शन मिळतात. हे चाललंय काय? जर केंद्र सरकार या सगळ्याचं नियंत्रण करत असेल, तर मग फक्त भाजपाच्याच लोकांना इंजेक्शन द्यायचं ठरवलंय का त्यांनी?” असा सवाल त्यांनी केला.

“आम्ही केंद्राला साष्टांग नमस्कार करतो. लोकांना तडफडू देऊ नका, मरू देऊ नका. हवं तर भाजपाच्याच लोकांना रेमडेसिविर इंजेक्शन द्या. पण लोकांना तडफडू देऊ नका, त्यांच्या कुटुंबीयांना वाचवा अशी विनंती माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आहे”, असं मुश्रीफ यावेळी म्हणाले.

Oxygen Shortage: राज्य सरकार केंद्र सरकारच्या पाया पडायला तयार आहे – राजेश टोपे

“भाजपाचं फक्त ममता बॅनर्जींना हरवण्याकडेच लक्ष”

“पंतप्रधान म्हणतात लस उत्सव करा, पण लसच नसेल तर उत्सव कसा करणार? अमेरिकेत ४ कोटी लसीचे डोस पडून आहेत. आपण ६ महिने परदेशालाच देत बसलो. दुसरी लाट येणार याकडे आपलं लक्षच नाही. आपलं लक्ष कुठे होतं? व्हील चेअरवर बसलेल्या ममता बॅनर्जींना हरवण्याकडे आपलं लक्ष होतं. त्यांना हरवायचं हाच उद्देश घेऊन ही मंडळी ३ ते ४ महिने काम करत आहेत. पण त्याचा परिणाम म्हणून जगात आपली नाचक्की झाली आहे. सगळं जग म्हणतंय भारताला मदत द्या. किती नाचक्की झाली आपली?” असा सवाल देखील मुश्रीफ यांनी केला.

राजेश टोपेंनीही केली होती केंद्राकडे मागणी

“राज्य सराकर सर्व प्रकारे अक्षरश: नम्र विनंती करायला तयार आहे, पाया पडायला तयार आहे. राज्याच्या जनतेसाठी राज्य सरकार कोणतीही गोष्ट करायला तयार आहे. ऑक्सिजन उपलब्धतेचा कोटा वाटप केंद्र सरकारकडे आहे. तो त्यांनी अधिकाधिक द्यावा आणि ग्रीन कॉरिडॉर करून महाराष्ट्रात ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावा अशी विनंती आम्ही केंद्र सरकारला केली आहे”, अशी प्रतिक्रिया राजेश टोपेंनी दिली होती. नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे २४ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारकडे ऑक्सिजन पुरवठ्यासाठी मागणी केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2021 7:51 pm

Web Title: hasan mushrif on remdesivir shortage in maharashtra targets bjp central government pmw 88
Next Stories
1 औरंगाबादमध्ये रेमडेसिविरचा काळाबाजार; २० हजाराला एका इंजेक्शनची सुरु होती विक्री
2 …तर मी पोलीस कॉन्स्टेबलचीही माफी मागेन – देवेंद्र फडणवीस
3 महाराष्ट्राने लसीकरणात ओलांडला दीड कोटींचा टप्पा ; आरोग्यमंत्री टोपेंनी केलं ट्विट
Just Now!
X