कायदा व सुव्यवस्थेच्या कारणासाठी कोल्हापूर दौरा रद्द केल्याने संतापलेल्या किरीट सोमय्या यांनी कराड इथं पत्रकार परिषद घेतली आणि आपल्या पुढच्या कामाची दिशा सांगितली. यावेळी लवकरच मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा बाहेर काढणार तसंच याविरोधात ईडीकडे तक्रार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. किरीट सोमय्या यांच्यावर केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी आता हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्यावरच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे.

आपल्या पत्रकार परिषदेत बोलताना मुश्रीफ यांनी आपल्या तब्येतीची चौकशी केल्याबद्दल किरीट सोमय्या यांचे आभारही मानले. त्यांच्या आरोपांना उत्तर देताना ते पुढे म्हणाले, किरीट सोमय्या जे आरोप करत आहेत, त्यामागे भारतीय जनता पार्टीचं फार मोठं षडयंत्र आहे. आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे याचे खरे मास्टरमाईंड आहेत. मी अनेक वेळा माध्यमांसमोर येऊन बोललो आहे, आवाज उठवला आहे आणि यामुळे भाजपाचे नेते मला कसं थांबवता येईल, दाबता येईल याचा प्रयत्न करत होते. किरीट सोमय्या यांचा वापर त्यांनी फक्त टूल म्हणून केलेला आहे. चंद्रकांत पाटलांना सातत्याने चिंता वाटते की आपण प्रदेशाध्यक्ष आहोत त्या जिल्ह्यामध्ये भाजपा भुईसपाट झालेला आहे. हा कोणी भुईसपाट केला? तर हसन मुश्रीफ याला कारणीभूत आहेत. म्हणून त्यांनी गेल्यावेळेला मला भारतीय जनता पार्टीत येण्याची सुद्धा विनंती केली होती. मात्र पवार एके पवार म्हणत मी ती विनंती मान्य केली नाही.

हेही वाचा – हसन मुश्रीफांचा तिसरा घोटाळा लवकरच बाहेर काढणार; किरीट सोमय्या यांचा इशारा

कायदा व सुव्यवस्थेच्या कारणासाठी कोल्हापूर दौरा रद्द केल्याने संतापलेल्या किरीट सोमय्या यांनी कराड इथं पत्रकार परिषद घेतली आणि आपल्या पुढच्या कामाची दिशा सांगितली. यावेळी लवकरच मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा बाहेर काढणार तसंच याविरोधात ईडीकडे तक्रार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी बोलताना ते म्हणाले, हसन मुश्रीफ यांचे जावई हे ब्रिक्स इंडिया लिमिटेड या कंपनीचे बेनामी मालक आहेत. ही कंपनी आणि सरसेनापती कारखान्यामध्ये ५० कोटीची आर्थिक उलाढाल झाली आहे. या कंपनीत आलेले पैसे अपारदर्शक पद्धतीने आले आहेत. या व्यवहाराबद्दल काहीही माहिती नाही. एकूण १०० कोटींचा हा घोटाळा आहे.

सोमय्या यांच्या याच आरोपांना प्रत्युत्तर देत हसन मुश्रीफ यांनी जोरदार टीका केली आहे.