परतीच्या मान्सूनमधील हस्त नक्षत्राने जिल्हय़ात चांगलाच तळ ठोकला असून, ओढे-नाले दुथडी भरून यंदाच्या हंगामात प्रथमच वाहू लागले आहेत. शनिवारी सकाळपर्यंत जिल्हय़ात सरासरी २३.३ मिलिमीटर पाऊस झाला असून, सर्वाधिक पाऊस विटा तालुक्यात ३७ मिलिमीटर झाला असल्याचे पूरनियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. शनिवारी सायंकाळीही पलूस, कुंडल परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले.
हस्त नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात वीज-वाऱ्यासह जोरदार पावसाने जिल्हय़ाच्या दुष्काळी टापूत दमदार वर्षांव सुरू केला आहे. कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आटपाडी, दिघंचीसह जत, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर कडेगाव आदी भागांत गेले तीन दिवस पावसाची जोरदार हजेरी लागत आहे. शनिवारीही या परिसरात सायंकाळी जोरदार पाऊस सुरू होता.
जलसंपदा पूरनियंत्रण कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्हय़ात सरासरी २३.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या कालावधीत जिल्हय़ात २३३.४ मिलिमीटर पाऊस झाला असून, यंदाच्या हंगामात आतापर्यंत ३२९८ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
आज सकाळी तालुक्याच्या ठिकाणी नोंदला गेलेला पाऊस असा इस्लामपूर १४, पलूस २८, तासगाव २६, सांगली १८, मिरज २४.९, शिराळा २, विटा ३७, आटपाडी २५.३, कवठेमहांकाळ २३.६, जत १८.६ आणि कडेगाव ३३.६ मिलिमीटर. वारणा धरणातील पाणीसाठा ३१.५५ टीएमसी झाला असून धरण ९२ टक्के भरले आहे.
पावसाने अनेक गावांतील परस्पर संपर्क तुटला होता. यामध्ये कडेगाव येथे पुलावर पाणी आल्याने शुक्रवारी कराड-विटा मार्ग तीन तास बंद होता. तसेच कवठेमहांकाळ जत मार्गही काही काळासाठी बंद होता. याशिवाय ग्रामीण भागातील ओढय़ानाल्यांना तुडुंब पाणी आल्याने पाणंद रस्ते रात्रभर बंद होते. सायंकाळच्या दोन तासांच्या जोरदार पावसानंतर रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. भिजपावसाने रानातील ओली खोलपर्यंत झाल्या असून गावतळय़ाचे पाणी सांडव्याबाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. मिरज तालुक्यातील आरगचे गावतळे शुक्रवारच्या पावसाने भरले असून सांडव्यातून पाणी बाहेर पडले आहे.