धवल कुलकर्णी

सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये अर्थचक्र जवळपास खंडीत झाले आहे. हातावर पोट असणाऱ्या वर्गाचे प्रचंड हाल सुरू आहेत. पण दारूचे दुकान बंद असल्यामुळे राज्यातल्या तळीरामांची भलतीच अवस्था होत आहे. याचमुळे असेल कदाचित यांच्यापैकी काही लोक देशी दारूची तहान हातभट्टीवर भागवू पाहत आहेत…

कांतीलाल उमप, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, यांनी लोकसत्ता डॉट कॉम ला सांगितले की आत्तापर्यंत त्यांच्या खात्याने केलेल्या एकूण कारवाई पैकी जवळजवळ ९० टक्के कारवाया हातभट्टीच्या संदर्भात होतया. या कारवायांमध्ये फारच छोटा वाटा हा विदेशी बनावटीच्या मद्याच्या तस्करी किंवा डुप्लिकेशन संदर्भात आहे.उमप म्हणाले ही काही मंडळी गुळासारख्या कच्च्या मालाचा वापर करून हातभट्ट्या लावत आहेत. राज्याच्या सर्व सीमा यातील बंद केल्यामुळे बाहेरील राज्यातून दारूची तस्करी करणे जवळजवळ अशक्य झाले आहे.

राज्य उत्पादन शुल्क खात्याचे वरिष्ठ अधिकारी मान्य करतात ही हातभट्टीची मद्यविक्री रोखणे प्रचंड गरजेचे आहे कारण यातून मोठ्या प्रमाणावर मृत्यू होण्याचा संभव असतो. त्याच बरोबर काही लोक स्वतःकडे असलेला दारूचा स्टॉक सुद्धा चढ्या किमतीने विकत आहेत किंवा बनावट दारू जुन्या बाटल्यांमध्ये भरून लोकांना खरी दारू असल्याचे भासवत भरपूर नफा कमवत आहेत.

रविवारी राज्य उत्पादन शुल्क खात्याने एकूण ६० गुन्हे दाखल करून ३२ लोकांना अटक करून २० लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या माहितीप्रमाणे आतापर्यंत एकूण ३२१४  गुन्हे दाखल करून १३३४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ही रुपये ८.४३ कोटी आहे.