News Flash

हाथरसवर उद्धव ठाकरेंनी चिंता व्यक्त केली, पण…; विजया रहाटकरांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्या २५ घटना

राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांकडे वेधलं लक्ष

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एका युवतीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेवर बोलताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली होती. तसेच राज्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ देणार नाही, असं म्हटलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेवरून भाजपाच्या नेत्या विजया रहाटकर यांनी ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी २५ पेक्षा अधिक घटना मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.

हाथसर सामूहिक अत्याचार घटनेचा संदर्भ देत भाजपाच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. पत्राद्वारे त्यांनी सरकारचे महिला सुरक्षेच्या अनेक मुद्द्यांवर लक्ष वेधले आहे. “दिशा कायद्याचे काय झाले?, महिला आयोगाचे अध्यक्षपद आठ महिन्यांपासून रिकामे का?, कोविड सेंटर्समधील अत्याचारांच्या घटना रोखण्यासाठी एसओपी कधी निश्चित करणार?, काही घटनांची सुनावणी फास्ट ट्रक कोर्टात का चालविली जात नाही?, काही प्रकरणांमध्ये विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती का केलेली नाही?,” असे प्रश्न रहाटकर यांनी उपस्थित केले आहेत.

गेल्या काही महिन्यांतील राज्यातील अत्याचारांच्या २५ निवडक घटनांची माहिती रहाटकर यांनी पत्रासोबत दिली आहे. “या माहितीवर नुसती नजर जरी टाकली, तरी अत्याचारांच्या जळजळीत वास्तवाने थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही. आपण हाथरसमधील घटनेबाबत चिंता व्यक्त केली; पण राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालानुसार, २०१९मध्ये महाराष्ट्रात हाथरससारख्या (बलात्कार व त्यानंतर खून) तब्बल ४७ घटना घडल्या आहेत. अशा घटनांमध्ये देशात पहिल्या क्रमाकांवर असण्याची नामुष्की महाराष्ट्रावर ओढविली आहे. बलात्कार आणि महिला अत्याचारांच्या अन्य घटनांची संख्याही महाराष्ट्रात विलक्षण असल्याची माहिती ‘एनसीआरबी’च्या अहवालातून मिळते. अशास्थितीत आपल्या सरकारकडून कार्यक्षम पावले उचलली जात नाहीत. तशी कोणताही राजकीय इच्छाशक्ती दाखविली गेली नाही. महिला अत्याचारांच्यासंदर्भात नुसतीच गोड गोड भाषणं, पोकळ आश्वासनं देऊन उपयोग नाही. गुन्हेगारांना जरब बसेल, अशी पावलं सरकारनं व पोलिसांनी उचलली पाहिजेत”, अशी मागणी रहाटकर यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात विजया रहाटकर यांनी उल्लेख केलेल्या काही गंभीर घटना पुढीलप्रमाणे :

कऱ्हाड येथे १० वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर ५४ वर्षांच्या नराधमाने केला बलात्कार ( ४ ऑगस्ट २०२०).

गाव मौजे मंचर (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथून २८ जून २०२० ते ३० जून दरम्यान ५ मुली व १ प्रौढ महिला बेपत्ता.

गाव मौजे नारायणगाव (ता. जुन्नर, जि. पुणे) येथून १४ मुली बेपत्ता. (११ जून २०२०).

गाव मौजे मंठा (जि. जालना) येथील वैष्णवी नारायण गोरे या नवविवाहितेचा लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी अशफाख शेख बाबू याने २१ वार करून निर्घृण खून केला. (३० जून २०२०)

गाव मौजे करंजविहीरे (ता. खेड, जि. पुणे) येथे १७ वर्षीय मुलीचा विवस्त्र करून दगडाने ठेचून निर्घृण खून. (२४ जुलै २०२०)

गाव मौजे नांदुरा (जि. बुलढाणा) येथे ३ वर्षीय बालिकेवर अत्याचार. (२५ जुलै २०२०)

गाव मौजे पाबळ (ता. शिरूर, जि. पुणे) येथे अश्लील व्हिडिओ पहात बसलेल्या १७ वर्षीय मुलाकडून १९ वर्षीय मित्राच्या मदतीने ११ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार. ( ३ ऑगस्ट २०२०)

गाव मौजे तांबडी बुद्रुक (ता. रोहा, जि. रायगड) येथे १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून निर्घृण खून करण्यात आला. ( २६ जुलै २०२०)

बडनेरा (जि. अमरावती) येथे कोविड टेस्ट करण्यासाठी गेलेल्या तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेऊन लॅब टेक्निशियनकडून विनयभंग. (३० जुलै २०२०)

पनवेल (नवी मुंबई) येथील ४० वर्षीय करोना रुग्ण महिलेवर त्याच क्वॉरंटाईन सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या २५ वर्षीय करोना रुग्णाने बलात्कार केला. (१८ जुलै २०२०).

पुणे येथील सिंहगड कॉलेज क्वॉरंटाईन सेंटर येथे २९ वर्षीय महिला करोना रुग्णाचा सुरक्षा रक्षकाकडून विनयभंग. ( २१ जुलै २०२०)

कोल्हापूरमध्ये वॉर्ड बॉयने अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग. (२२ जुलै २०२०)

नंदुरबार येथे वॉर्डबॉयकडून कोविड सेंटरमध्ये तरुणीचा विनयभंग

मालाड येथील क्वॉरंटाईन सेंटरमध्ये एका तरुणीचा विनयभंग. ( २२ जून २०२०)

इचलकरंजी येथील क्वॉरंटाईन सेंटरमधील मुलीचा आरोपी आमीर मरमसाब शेखक़डून विनयभंग ( १६ मे २०२०)

औरंगाबाद येथे १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार. ( ४ ऑगस्ट २०२०)

चंद्रपूर येथे १६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार. बलात्कारानंतर मुलीची आत्महत्या. ( ७ ऑगस्ट २०२०)

जळगाव येथे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन दोघांनी केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार. संशयित आरोपींपैकी एक जण राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याचा मुलगा. (१३ ऑगस्ट २०२०).

अहमदनगर येथील पारनेर तालुक्यातील वाघुंडे गावात “बलात्काराची केस मागे घे”, असे म्हणत पीडित महिलेच्या १० वर्षांच्या मुलीला अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. ( १५ ऑगस्ट २०२०)

गोरेगाव (मुंबई) येथे ६ वर्षांच्या बालिकेवर बलात्कार. (५ ऑक्टोबर २०२०).

पुणे येथे जम्बो कोविड सेंटरमध्ये सहकारी डॉक्टरांकडून महिला डॉक्टरचा विनयभंग.

गोंडपिपरी तालुक्यातील मेनबोथला गावात आजोबांचा अंत्यसंस्कार करून आल्यानंतर काकानेच १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला व नंतर तिला जिवे मारण्याची धमकी दिली. (५ ऑक्टोबर २०२०).

उस्मानाबाद शहराजवळील राघुची वाडी येथील एका अल्पवयीन मुलीवर सावत्र वडिलांकडून सलग ३ महिने अत्याचार. (७ ऑक्टोबर २०२०).

चंद्रपूर येथील नागभिड तालुक्यातील कासर्डा येथील १६ वर्षीय मुलीवर दोघांकडून बलात्कार; घटनेनंतर मुलीची आत्महत्या. ( ८ ऑगस्ट २०२०).

मानखुर्द (मुंबई) येथे चालत्या गाडीत १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार. (१२ ऑगस्ट २०२०).

उमरगा (जि. उस्मानाबाद) येथील वीटभट्टीवरील मजूर महिलेवर चौघांकडून वारंवार अत्याचार.

पोलिसांनी विचारलेल्या उलटसुलट प्रश्नांमुळे नालासोपारा येथील बलात्कार पीडितेची आत्महत्या (५ आक्टोबर २०)

नागपूरमध्ये पोलिसाकडून गुंगीचं औषध देऊन बलात्कार. व्हिडीओवरून ब्लॅकमेल केल्याची तक्रार (१ आॅक्टोबर २०)

नगर शहरातील पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्याविरोधात बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. (२८ सप्टेंबर २०)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 4:54 pm

Web Title: hathras gangrape case vijaya rahatkar write uddhav thackeray cm maharashtra violence against women in maharashtra bmh 90
Next Stories
1 दुःखद! भारत-चीन सीमेवर कर्तव्यावर असताना सांगोल्यातील जवानाचा करोनाने मृत्यू
2 राज ठाकरे यांचा उदय सामंत यांना फोन; दोन दिवसांत निर्णय घेण्याचं दिलं आश्वासन
3 राज्य शिखर बँक घोटाळा; अजित पवारांसह ६९ जणांना ‘क्लीन चीट’
Just Now!
X