दयानंद लिपारे, कोल्हापूर

सामान्य शेतकरी ते राष्ट्रीय पातळीवरील शेतकरी नेता अशी वाटचाल करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांची राजकीय वाटचाल हातकणंगलेच्या निकालाने रोखली गेली आहे. लोकसभा निवडणुकीत या दिग्गज नेत्यांस शिवसेनेच्या युवा चेहऱ्याने लाखाच्या फरकाने पराभूत केले. गेली २० वर्षे राजकीय पटलावर सतत वरची पायरी चढणाऱ्या शेट्टी यांना साखर कारखानदारांची ‘गोड संगत’ भोवली. धैर्यशील माने यांनी माने घराण्यातील तिसरा खासदार म्हणून संसदेची पायरी चढताना ‘जायंट किलर’ अशी प्रतिमा तयार केली आहे.

राजकारण आणि शेती याचा निकटचा संबंध राहिला आहे. कृषिप्रधान देशात शेतीचे नवनवे प्रश्न सातत्याने डोके वर काढत असतात. शेतीचे प्रश्न कवेत घेऊ न शेतकरी संघटनांचे राजकरण आणि त्यायोगे थेट राजकारणात प्रभाव पाडणारी अनेक प्रमुख प्रभावशाली व्यक्तिमत्त्वं राज्यात उदयाला आली. त्यातील दोघांनी तर संसद गाठण्यात यश मिळवले. त्यातील पहिले उदाहरण म्हणजे शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी आणि दुसरे त्यांच्याच मुशीत घडलेले राजू शेट्टी यांचे. जोशी यांच्यापासून फारकत घेऊ न शेट्टी यांनी स्वत:च्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा रोवला. गेली २० वर्षे ते स्वाभिमानीच्या माध्यमातून ऊ स-दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी लढत राहिले. त्याच्या जोरावर जिल्हा परिषद सदस्य, शिरोळचे आमदार आणि सलग दोनदा हातकणंगले मतदारसंघातून खासदार अशी वरची पायरी ते चढत राहिले. राज्यात कोणत्याही शेतकरी नेत्याला मिळाले नाही असे यश त्यांना मिळत राहिले. पण, वरची पायरी चढताना खालच्या पायरीचे विस्मरण झाले आणि त्याला जोडूनच काही घटना-घडामोडींमुळे त्यांच्या खासदारकीची कवच कुंडले यंदा गळून पडली.

असंगाशी संग

राजू शेट्टी यांच्या पराभवाची जी प्रमुख कारणे पुढे येतात, त्यातील सर्वात महत्त्वाचे ठरले ते त्यांचा बदललेला पवित्रा. राजकीय आणि संघटनात्मक धोरण बदलाचाही. ऊ स दराचे आंदोलन करताना शेट्टी यांचा आजवर साखर कारखानदारांशी मोठा संघर्ष झाला.

शेतकरी प्रश्नांसाठी रस्त्यावर येत रक्तपात, अटकसत्र, खटले यांनी भरलेला हा काळ होता. शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांना संरक्षण पुरवणारे तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते यांच्यात कलह वाढत राहिला. साखर कारखानदारांना आव्हान देतच शेट्टी राजकीय प्रवास सहजपणे करू शकले. मात्र, त्या वेळी त्यांचा हा प्रवास महायुतीच्या बोटीतून सुरू होता. त्यामुळे त्यांच्या या राजकारणात त्यांना यशही मिळत गेले. मात्र यंदाच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी महायुतीशी फारकत घेत काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी केली. ऊस उत्पादकांसाठी ही एकप्रकारे त्यांनी कारखानदारांशी केलेली सलगी होती.

आजवर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ज्यांच्याशी लढा दिला; अद्याप ज्यांनी शेतक ऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीत, त्याच कारखानदारांच्या कळपात शेट्टींचा झालेला हा प्रवेश त्यांच्यापुढे अनेक प्रश्न निर्माण करत गेला. शेट्टी यांचे जुने मित्र सदाभाऊ  खोत यांच्यापासून ते तालुका पातळीवर नाराज होऊ न बाजूला गेलेल्या संघटनेच्या स्थानिक नेत्यांनी शेट्टी यांच्या या बदलत्या वर्तनावरून टीकेचा भडिमार सुरु ठेवला. ऊ स उत्पादक शेतकऱ्यांच्या मनामध्ये चलबिचल झाली. त्याचा परिणाम मतांवर मोठय़ा प्रमाणात झाला.

राजकारणातील तिसरी कोलांटी

शेतकरी संघटन हे राजू शेट्टी यांचे मूळचे व्रत. त्याला राजकीय रंग चढत जाऊन संघटनेऐवजी राजकारण याला महत्त्व येत गेले. त्यातून प्रत्येकवेळी सोयीच्या सोयरिकी जोडल्या गेल्या. त्यातील काही स्वीकारल्या गेल्या तर काही नाकारल्या गेल्या. स्वाभिमानीचे रोपटे रुजवल्यावर शेट्टी स्वबळावर आमदार झाले. डावे, जनता दल  (रिडालोस) यांच्या मदतीने त्यांनी पुढे पहिल्यांदा शिवारातून संसद गाठली. गेल्या वेळी त्यांनी महायुतीकडून निवडणूक लढवली. तेव्हा, विरोधकांनी शरद जोशी यांच्या भाजपच्या हातमिळवणीला विरोध करणारे शेट्टी आता त्यांच्या पंक्तीला कसे जाऊ न बसले? अशी विचारणा करीत त्यांना कोंडीत पकडले होते. पण, तेव्हा मोदी लाटेतून ते पुन्हा संसदेत पोहोचले. या वेळी मात्र त्यांनी आजवर ज्यांच्याशी दोन हात केले त्याच काँग्रेस- राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. ज्यांच्या नावाने बोटे मोडली ते शरद पवार आणि शेट्टी हे गळ्यात गळे घालत असल्याच्या या चित्राचा शेतकरी मतदारांवर उलटा परिणाम झाला. या साऱ्याचाच परिमाम होत त्यांचे मतदान घटत गेले आणि यातून संसद गाठणाऱ्या शेट्टींचे राजकीय शिवार उद्ध्वस्त होत गेले.