कोकणातील बळीराजा मान्सूनच्या आगमनाची चातकासारखी वाट बघत असतानाच येत्या ७२ तासांत जिल्ह्य़ात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
गेल्या वर्षांप्रमाणे यंदाही जून महिन्याचा पूर्वार्ध कमी पावसाचा ठरला आहे. त्यामुळे जिल्ह्य़ात पेरण्याही खोळंबल्या आहेत. तीन दिवसांपूर्वी चक्रीवादळाच्या इशाऱ्यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत आणखी भर पडली होती. सुदैवाने वादळाचा धोका टळला असला तरी त्यामुळे पावसाचे आगमनही लांबणीवर पडले आहे. मात्र आगामी तीन दिवसांत जिल्ह्य़ात काही ठिकाणी ७ ते २४ सेंटीमीटर इतका पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याचबरोबर पुढील आठवडय़ात मान्सूनच्या नियमित वर्षांवाचीही अपेक्षा आहे.
समुद्राला उधाण
दरम्यान, पुढील आठवडय़ातील १५ ते १८ जून या काळात समुद्राच्या लाटा ४.५ मीटरपेक्षा जास्त उसळण्याची शक्यता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने व्यक्त केले आहे. या चार दिवशी किमान ४.५१ मीटर ते ४.६१ मीटर उंचीपर्यंतच्या लाटा उसळतील, असा अंदाज आहे. त्यामुळे किनारपट्टीच्या भागात सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.