निखिल मेस्त्री, पालघर

पालघर शहराजवळ असलेल्या कोळगावस्थित जेनेसीस औद्योगिक वसाहतीतील फेज ३ मधील बंद गोदामांत अवैधरीत्या साठवणूक केलेला हजारो टन रासायनिक घनकचरा आणि घातक टाकाऊ  रसायनांचा साठा आढळून आला आहे. पाच गोदामांत मिळून सुमारे ३५० पिंप टाकाऊ  रसायन आणि हजरो गोणी भरलेले घातक घनकचरा ग्रामस्थांनी पकडून पोलीस प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ताब्यात दिले आहे.

शासन नियमानुसार कोळगाव हा हरित पट्टय़ाखाली असतानादेखील येथे छुप्या पद्धतीने अवैधरीत्या टाकाऊ  रसायने व घातक घनकचराची साठवणूक केली जात होती याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. काही महिन्यांपासून गाव परिसरात उग्र वास येत होता. तसेच पिण्याच्या पाण्याचे साठे दूषित आणि रसायनयुक्त झाले आहेत, हे लक्षात घेता गाव पातळीवर ग्रामस्थांनी विविध ठिकाणी पाळत ठेवली.

जेनेसीसच्या या ठिकाणी असे अवैध व घातक काम सुरू असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यानुसार त्यांनी सापळा रचत येथे हा घातक कचरा साठवणूक केलेल्या गोदामकडे सोमवारी सकाळी धाव घेतली. त्या वेळी घातक रासायनिक घनकचरा साठवून ठेवला असल्याचे उघड झाले.

नागरिक जमत असल्याचे पाहून तेथील ट्रकचालक आणि कामगार हा ट्रक सोडून फरार झाले. गोदामात असलेल्या व्यवस्थापकास त्यांनी याबाबत जाब विचारला. त्यावेळी त्याने कंपनीचे मालक इतर असल्याचे सांगितले. नागरिकांनी याबाबत पोलीस व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास घटनेची माहिती दिली. त्यानंतर या गोदामात पालघर पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. पुढील कार्यवाही सुरू आहे.

पोलिसांच्या ताब्यात असलेला राकेश रॉय याने हा अवैध साठा साठवण्यासाठी अजगर अली यांनी सांगिल्याची कबुली पोलिसांसमोर दिली.रसायनांचे नमुने प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतलेले आहेत. हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर तसेच तळोजा येथे असलेल्या टाकाऊ  रासायनिक आणि घनकचरा विघटन केंद्र व्यवस्थापनामार्फत या कचऱ्याचे स्वरूप आणि त्याची विल्हेवाट लावणे यासाठीची कार्यवाही सुरू आहे.