इंग्रजीत अनुत्तीर्ण होणार या भीतीने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा बळी गेल्याची घटना शनिवारी कोल्हापुरात घडली. ज्या इंग्रजीची धास्ती त्याने घेतली होती त्याच विषयात तो उत्तीर्ण झाल्याचे आज दिसून आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रणव सुनील जरग (वय १६, रा. आर. के. नगर) या विद्यार्थ्यांने भीतीपोटी आत्महत्या केली. दहावीची परीक्षा अवघड असते हे विद्यार्थ्यांच्या मनावर ठसले आहे. त्यात इंग्रजी हा विषय आपली दांडी उडवणार याची सर्वाधिक भीती असते. हेच भयगंड येथील एका दहावीच्या विद्यार्थांच्या जीवावर बेतले. प्रणव हा येथील देशभक्त रत्नाप्पा कुंभार विद्यालयाचा विद्यार्थी होता.

दहावीच्या परीक्षेत आपण इंग्रजी विषयात अनुत्तीर्ण होणार याची भीती त्याला गेली चार दिवस भेडसावत होती. त्याने ही गोष्ट सांगितल्यानंतर घरचे लोक त्याला धीर देत होते. ‘अनुत्तीर्ण झालास तरी चालेल हरकत नाही, पुन्हा प्रयत्न कर’ असा सल्ला त्याला वडील सुनील जरग यांनी दिला होता. पण प्रणव मनातून खचला होता. त्याच्या मनाने उभारी घेतली नाही.

गुरुवारी सायंकाळी घरात कोणी नसताना त्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. शनिवारी मित्र परिवाराने प्रणव हा ४२ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाल्याचे नातेवाईकांना कळवले. पण ही सुखवार्ता ऐकायला प्रणव या जगात नव्हता.