News Flash

मुख्याध्यापक, शिक्षकांच्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश सक्तीचा

जळगाव जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत एक हजार ८४० प्राथमिक शाळा आहेत.

जळगाव जिल्हा परिषद शिक्षण समितीने मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश सक्तीचा करण्याचा धाडसी ठराव शिक्षण समिती सभेत मंजूर केला आहे.  संग्रहित छायाचित्र

युवराज परदेशी, जळगाव

जळगाव जिल्हा परिषद शिक्षण समितीचा धाडसी निर्णय; गुणवत्ता वाढलेल्या शाळांकडे सर्वाना आकर्षित करण्याचा प्रयत्न

इंग्रजी माध्यमाच्या विशेषत: सीबीएससी शाळांचे लोण आता शहरी भागातून ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. या शाळांमध्ये देणगी देऊनही प्रवेश मिळत नसताना दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांना विद्यार्थी मिळत नसल्याचा विरोधाभास दिसून येतो. यामुळे पुरेशी विद्यार्थी संख्या नसल्याने शाळा किंवा वर्ग बंद करण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. यातून शिक्षक समायोजनाचा तिढादेखील वाढत आहे. यावर उपाय म्हणून तसेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढावी याकरिता जळगाव जिल्हा परिषद शिक्षण समितीने मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश सक्तीचा करण्याचा धाडसी ठराव शिक्षण समिती सभेत मंजूर केला आहे. या अनोख्या निर्णयाचे पालक, शिक्षणतज्ज्ञांनी स्वागत केले आहे. यामुळे पालकांचा जिल्हा परिषदेच्या शाळांवरील विश्वास वाढण्यास मदत होईल, असा आशावाद व्यक्त केला आहे.

जळगाव जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत एक हजार ८४० प्राथमिक शाळा आहेत. यात सुमारे एक लाख ९२ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून सात हजार ३५२ शिक्षक कार्यरत आहेत. मात्र या शाळांची शैक्षणिक गुणवत्ता हा नेहमी चर्चेचा विषय ठरतो.

गेल्या तीन वर्षांत विद्यार्थी संख्येअभावी ५० पेक्षा जास्त शाळांचे समायोजन किंवा वर्ग बंद करण्यात आले आहेत. ही परिस्थिती सुधारण्यासाठी शिक्षण विभागाने अनेक योजना हाती घेतल्या असून त्यात आता सुधारणा दिसू लागल्या आहेत. मागील दोन वर्षांत ६६ शाळांना आयएसओ मानांकन मिळाले आहे.

एक हजार २२१ शाळा पूर्णपणे डिजिटल झाल्या असून रावेर, भुसावळ, धरणगाव आणि अमळनेर या तालुक्यातील सर्व शाळा डिजिटल झाल्या आहेत.

या शाळांमध्ये टीव्ही संच, प्रोजेक्टर, शैक्षणिक सीडीज् असून येथे स्वतंत्ररीत्या तयार करण्यात आलेला डिजिटल अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकविला जातो.

लोकसहभागातून सव्वा कोटी

शाळांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी लोकसहभागातून एक कोटी १३ लाख रुपयांचा निधी उभारण्यात आला असून त्यातून शाळांचे सुशोभीकरण, डिजिटलायजेशन, बसण्यासाठी बाक, संगणक आदी सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात आले असल्याची माहिती शिक्षण समिती सभापती पोपट भोळे यांनी दिली. आता पुढचे पाऊल म्हणून जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक हे ज्या शाळेत कार्यरत आहेत, त्या शाळेत त्यांच्या मुलांचे प्रवेश घेणे आवश्यक करण्यात येणार आहे. त्यामुळे स्वत; शिक्षकांची मुलेच या शाळेत शिक्षक असतील तर गुणवत्तादेखील वाढून गावातील इतर पालकांचा दृष्टिकोन बदलून पटसंख्या वाढीस मदत होईल. यास शिक्षण समिती सभेत मंजूरी देण्यात आली असून येत्या सर्वसाधारण सभेचीही मंजुरी घेण्यात येणार आहे. पालक सहसा आपल्या पाल्यांचा जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेण्याऐवजी खासगी शाळांमध्ये प्रवेश घेण्यास प्राधान्य देतात. पर्यायाने जिल्हा परिषद शाळांकडील विद्यार्थ्यांचा ओढा कमी होऊन पटसंख्या टिकविणे कठीण झाले आहे. जर तेथे शिक्षकांचीच मुले शिकतील तर अन्य पालकांचा विश्वासही वाढेल, असे भोळे यांनी सांगितले.

जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढावी यासाठी कोणत्या उपाययोजना राबविल्या पाहिजेत, यासंदर्भात आम्ही पालकांशी वेळोवेळी चर्चा केली. त्यानुसार डिजिटल अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांना बसायला बाक, संगणक शिक्षण आदी नावीन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबविले. याावेळी काही पालकांनी सांगितले की, आम्ही आमची मुले पाठवितो. मात्रे तुमचे शिक्षक त्यांच्या मुलांना येथे शिकवतील का, असा प्रश्न उपस्थित केला. आता आमच्या शाळांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारल्याने अनेक शिक्षकांनी पालकांच्या भूमिकेचे स्वागत केले. त्यानुसार हा निर्णय आम्ही घेतला आहे. यामुळे शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.

पोपट भोळे, (सभापती, शिक्षण समिती, जिल्हा परिषद, जळगाव)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 3:20 am

Web Title: headmaster teachers children should take admission in zilla parishad
Next Stories
1 नियमावली तयार करण्याची जबाबदारी गृहखात्याचीच
2 वॉटर कप स्पर्धेच्या बक्षीस रकमेची सरपंच, ग्रामसेवकाकडून लूट 
3 धक्कादायक : पती-पत्नीच्या भांडणात दोन चिमुकल्यांचा मृत्यू
Just Now!
X