रुग्णालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन

सांगली : शिराळा उपजिल्हा रग्णालयाची नूतन वास्तू शहराच्या वैभवात भर घालणारी असून या माध्यमातून कमीत कमी खर्चात सर्वसामान्य लोकांना उत्तमात उत्तम आरोग्य सुविधा मिळावी, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री आणि सांगली जिल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

उपजिल्हा रुग्णालय शिराळा या नवीन रुग्णालय वास्तूचा उद्घाटन समारंभ, लोकनेते फत्तेसिंगराव नाईक यांच्या पुण्यतिथीनिमीत्त आयोजित कृषी प्रदर्शन, प्राथमिक आरोग्य केंद्र बिळाशीचे भूमिपूजन या विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने आयोजित समारंभात ते बोलत होते. या वेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री राजेश टोपे, खासदार धर्यशील माने, आमदार मानसिंगराव नाईक, शिराळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अर्चना शेटे आदी उपस्थित होते.

या वेळी बोलताना मंत्री पाटील म्हणाले, जलसिंचन खाते सांगली जिल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून वाकुर्डे बुद्रुक योजना तत्काळ पूर्ण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात येतील. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्नशील आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणांनीही सामान्य माणसांच्या बाबतीत संवेदनशील राहून जनतेला पारदर्शी सेवा द्यावी. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शाळेतच जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी शिराळा, वाळवा तालुक्यात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. सांगली जिल्यातील लोकांचे रेशनकार्डासाठी हेलपाटे वाचविण्यासाठीही विशेष प्रयत्न चालू आहेत. तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी विविध खात्यांतील रिक्त पदे भरण्यास प्राधान्य देण्यात आले आहे असे सांगितले.

उपजिल्हा रुग्णालय शिराळाची १४ कोटी ६९ लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेली नूतन वास्तू शहराच्या वैभवात भर घालणारी असल्याचे सांगून सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री राजेश टोपे म्हणाले, या भागाची गरज लक्षात घेऊन डायलेसीस युनिट व त्यासाठी आवश्यक पदे ही निर्माण केली जातील. आरोग्य वर्धिनी योजनेच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य सेवेचे राज्यभरात बळकटीकरण करण्यात येणार आहे.

खासदार धर्यशील माने यांनी सामान्य माणसांना गुणवत्तापूर्ण सेवा या रुग्णालयाच्या माध्यमातून मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करून वाकुर्डे बुद्रुक योजना व अन्य विकास कामांना गती देण्याची आवश्यकता व्यक्त केली.

आमदार मानसिंगराव नाईक यांनी शिराळा तालुका विकास कामांमध्ये अग्रेसर ठेवण्यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे सांगून शिराळा उपजिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक पद निर्मिती व्हावी, ५० खाटांवरून हे रुग्णालय १०० खाटांचे व्हावे, डायलेसिस केंद्र सुरू व्हावे, वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या कामांना गती द्यावी असे आग्रही प्रतिपादन केले. या कार्यक्रमात उपजिल्हा रुग्णालयाच्या उभारणीसाठी योगदान देणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी विविध पदाधिकारी, अधिकारी, नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.