संदीप आचार्य
एकीकडे राज्य सरकार आरोग्य विभागाला पुरेसा निधी देत नाही तर दुसरीकडे डॉक्टरांसह आरोग्य विभागातील हजारो पदे रिक्त असतानाही संपूर्ण करोना काळात आरोग्य विभागातील रुग्णालयांमध्ये सर्वाधिक करोना रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आरोग्य विभागाचा मृत्यूदरही सर्वात कमी आहे.

राज्यात गेल्या वर्षभराहून अधिक काळ आरोग्य विभागाच्या रुग्णालयातील डॉक्टर अहोरात्र करोना रुग्णोपचाराचे काम करत आहेत. अशाच प्रकारे महापालिका रुग्णालये व अन्य खासगी रुग्णालयातही मोठ्या प्रमाणात करोना रुग्णोपचार सुरु असले तरी आरोग्य विभागाला करोना रुग्णांव्यतिरिक्त लसीकरण, लहान मुलांचे आरोग्य, आरोग्य विषयक विविध राष्ट्रीय व राज्य उपक्रमांचेही काम करावे लागत आहे. माता व बालमृत्यू वाढू नयेत यासाठीही करोना काळात आरोग्य विभाग सतर्क राहून काम करत होता असे आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी सांगितले.

एकूणच राज्याचे आरोग्य व करोना उपचार नियोजन यात आरोग्य विभागाची भूमिका महत्वाची असून १६ जूनपर्यंतच्या राज्यातील एकूण ५८,३३,८६५ करेना रुग्णांपैकी तब्बल ३८.३९ टक्के करोना रुग्णांवर आरोग्य विभागाच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. राज्यातील सर्व महापालिका रुग्णालयांत मिळून ३२.७६ टक्के रुग्णांवर उपचार केले गेले तर खासगी रुग्णालयात १६.७५ टक्के आणि १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मिळून १.२२ टक्के करोना रुग्णांवर उपचार करण्यात आले. याशिवाय केंद्र सरकार, रेल्वे, संरक्षण विभागाची रुग्णालये आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या रुग्णालयात काही प्रमाणात करोना रुग्णांवर उपचार केले गेले.

आरोग्य विभागाच्या जिल्हा रुग्णालयांपासून ग्रामीण रुग्णालयांत मिळून जवळपास ४८ हजार खाटा उपलब्ध आहेत. यातील बहुसंख्य या करोना रुग्णांसाठी राखून ठेवण्यात आल्या असून आजपर्यंत २२ लाख ७२ हजार २८३ रुग्णांनी या रुग्णालयात उपचार घेतले. यापैकी २२ लाख २५ हजार ८३९ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ३३,८०८ रुग्णांचे मृत्यू झाले. आरोग्य विभागाच्या रुग्णालयातील करोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण हे १.४८ टक्के एवढे असून देश व राज्य मृत्यू दरापेक्षा ते कमी आहे.

महाराष्ट्रात करोना उपचारात सर्वात वेगाने काम आरोग्य विभागाच्या रुग्णालयात होत असून मुंबई महापालिकेनेही करोना उपचारात गतिमानता दाखवली आहे. खासगी रुग्णालयात तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयात तुलनेत कमी संख्येने करोना रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. राज्यातील सर्व महापालिका रुग्णालयात मिळून १९ लाख ११ हजार ६९७ रुग्णांवर उपचार करण्यात आले तर २४,५०८ रुग्णांचे मृत्यू नोंदविण्यात आले आहेत. यात मुंबई महापालिका रुग्णालयात ७,२१,९६३ रुग्णांवर उपचार केले गेले तर आजपर्यंत १५,३३८ मृत्यू झाले आहेत. यापाठोपाठ पुणे, नागपूर आदी महापालिकांचा क्रमांक लागतो. राज्यातील सर्व खासगी रुग्णालयात मिळून ९,२१,८४६ करोना रुग्णांवर उपचार करण्यात आले असून त्यापैकी ३०,४९२ रुग्णांचे मृत्यू झाले. मृत्यूचे प्रमाण ३.११ टक्के एवढे आहे तर खाजगी महात्मा फुले जन आरोग्य योजना रुग्णालयात ७४,५३८ रुग्णांवर उपचार तर ५,१८३ मृत्यूंची नोंद असून मृत्यूचे प्रमाण ६.९४ टक्के एवढे आहे. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ७१,२८६ रुग्णांवर उपचार करण्यात आले असून १,८२६ मृत्यू नोंदविण्यात आले. हे प्रमाण २.६४ टक्के एवढे आहे.

करोना काळात आरोग्य विभागाच्या विविध रुग्णालयांत मिळून एकूण २६ लाख ३८ हजार २७१ रुग्णांवर उपचार करण्यात आले असून त्यामध्ये २२ लाखाहून अधिक रुग्ण हे करोना रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. खात्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ प्रदीप व्यास यांच्या योजनाबद्ध आखणी तसेच नियमित उपचार आढावा घेण्याच्या कार्यपद्धतीमुळे करोना रुग्णोपचारात गतिमानता व सुसूत्रता येऊन जास्तीत जास्त रुग्ण बरे झाल्याचे आरोग्य संचालक डॉ साधना तायडे यांनी सांगितले.  आरोग्य विभागाचे सर्वच डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचारी जीव तोडून काम करत असून हजारो रिक्त पदे भरली गेल्यास व पुरेसा निधी मिळाल्यास अधिक चांगल्या प्रकारे काम करता येईल, असेही डॉ साधना तायडे यांनी सांगितले.

१६ जूनपर्यंत राज्यात नोंदविण्यात आलेल्या ५८ लाख ३३ हजार ८६५ रुग्णांपैकी २२ लाख २५ हजार ८३९ करोना रुग्णांवर म्हणजे ३८.९४ टक्के रुग्णांवर आरोग्य विभागाच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. आता करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग नियोजन करत आहे. लहान मुलांसाठी स्वतंत्र खाटा, उपकरणे व औषधांची तसेच लहान मुलांच्या डॉक्टरांच्या नियुक्तीचे काम सुरु आहे. ऑक्सिजनपासून कशाचीही कमतरता पडणार नाही याचे नियोजन सुरु आहे. त्याचबरोबर पावसाळ्यातील जलजन्य आजार व साथीच्या आजारांचाही सामना आरोग्य विभागाला करायचा आहे. माता- बालमृत्यू रोखण्याबरोबर लसीकरण कार्यक्रमाची गती राखायची असल्याचे डॉ प्रदीप व्यास यांनी सांगितले. आजच्या घडीला करोना रुग्णांसाठी राज्यात एकूण ४,७३,७१० खाटा उपलब्ध आहेत यात विलगीकरणांतर्गत करोना रुग्णांसाठी १,३५,११७ खाटा आहेत तर १,०६,४७५ ऑक्सिजन खाटा आहेत. याशिवाय अतिदक्षता विभागात ३२,२१५ खाटा असून १२,६१६ व्हेंटिलेटर असल्याचे डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. सध्या करोना रुग्णांची रोजची संख्या खूपच कमी झाली असली तरी तिसऱ्या लाटेचा व त्यात लहान मुले जास्त असतील या तज्ज्ञांच्या सल्ला विचारात घेऊन आरोग्य विभागाकडून करोनाचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त सज्जता करण्यात येत असल्याचे डॉ प्रदीप व्यास यांनी सांगितले. त्याचप्रमाणे चाचण्यांचे प्रमाण वाढवून करोना रुग्ण व संपर्कातील लोकांना शोधण्याचे काम ग्रामीण भागात आम्हाला करायचे आहे असेही डॉ व्यास म्हणाले.

आरोग्य विभागाकडे सध्या उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हे सारे करणे अवघड आहे. यासाठी सरकारने मोठा निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागातील पदभरतीची घोषणा केली आहे. त्यानुसार पदभरतीचे कामही युद्धपातळीवर करावे लागणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.