शहरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, आरोग्य विभाग निष्क्रिय

प्रसेनजीत इंगळे, लोकसत्ता 

विरार : करोनाकाळात नागरिकांची स्वत:च्या आरोग्याबद्दल जागरूकता वाढल्याने छोटय़ा-मोठय़ा आजारांसाठी नागरिक डॉक्टरांकडे जात आहेत. याचाच फायदा घेत पुन्हा बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. शहरातील अनेक छोटय़ा-मोठय़ा वस्तीत, चाळीत शेकडो बोगस डॉक्टरांनी आपली दुकाने थाटण्यास सुरुवात केली आहे. उपचाराच्या नावाखाली राजरोसपणे रुग्णाच्या जिवाशी खेळ सुरू असतानाही महापालिका केवळ बघ्याची भूमिका घेत आहे, याबाबत संताप व्यक्त होत आहे.

करोनाकाळात पालिकेने शहरातील वैद्यकीय सेवा-सुविधांकडे लक्ष देऊन शहरातील रुग्णालयाची संख्या वाढवली आहे. पण त्याचबरोबर शहरातील बोगस डॉक्टरांकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. महापालिका स्थापनेपासून पालिकेने केवळ ६१ बोगस डॉक्टरांवर कारवाई केली आहे. या यादीत केवळ दोन रुग्णालयांचा समावेश आहे. शहरात शेकडो डॉक्टर आणि रुग्णालये कोणत्याही परवान्याशिवाय आपला धंदा करत आहेत.

पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरात एक हजार ८९ दवाखाने, ३६० रुग्णालये आणि १३९ आरोग्य चिकित्सा केंद्रे नोंदणीकृत आहेत. शहरात केवळ १५ ते २० एमबीबीएस डॉक्टर आहेत. तर एमडी डॉक्टरांची संख्या ७० ते ८० आहे. यामुळे लोकांना होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक डॉक्टरांवर अवलंबून राहावे लागत आहे. नोंदणीकृत होमिओपॅथिक डॉक्टरांची संख्या ३४० असून आयुर्वेदिक डॉक्टर ४५० हून अधिक आहेत.

याबाबत पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता वाळके यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शहरातील डॉक्टरांच्या संघटनादेखील बोगस डॉक्टरांबाबत उघडपणे बोलण्यास तयार नाहीत.

खिळ्याला सलाईनची बाटली

पालिकेकडे नोंदणी नसलेले तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदव्या नसलेले डॉक्टर्स रुग्णांवर उपचार करत असतात. त्यांच्यामुळे रुग्णांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विरार पूर्वच्या बरफपाडा परिसरात श्री क्लिनिक नावाचा दवाखाना आहे. या दवाखान्यात असलेले डॉक्टर हे होमिओपॅथी पदवीधर असून, ते अ‍ॅलोपॅथी उपचार करत आहेत. तसेच हे डॉक्टर रुग्णाला एका बाकावर झोपवून भिंतीवरील खिळ्याला सलाईनची बाटली अडकवून उपचार करत होते. अशा पद्धतीने खेडय़ापाडय़ात शेकडो डॉक्टर रुग्णाच्या जिवाशी खेळत आहेत.

शहर, ग्रामीण भागात दवाखाने

वसई-विरार परिसरात तज्ज्ञ डॉक्टरांचा तुटवडा असल्याने अनेक बोगस डॉक्टर शहर तसेच ग्रामीण भागात आपले दवाखाने सुरू करत आहेत. यात प्रामुख्याने चाळीच्या परिसरात आपली दुकाने थाटत असल्याचे दिसते. नालासोपारा पूर्वेला संतोष भुवन, पेल्हार, विरार पूर्वेला चंदनसार, वसईतील वालीव, भोयदापाडा, मोरेगाव, हनुमान नगर, बिलालपाडा, पांडय़े नगर, धानीव बाग, वाकणपाडा अशा काही परिसरात मोठय़ा प्रमाणत अनेक डॉक्टर आपले दवाखाने, रुग्णालये उघडून बसले आहेत. त्यांची कोणतीही नोंदणी महापालिकेकडे नाही.

करोनाकाळात बोगस डॉक्टरांवरील कारवाई बंद होती, पण लवकरच आम्ही वैद्यकीय विभागासह मोहीम राबविणार आहोत. तरी नागरिकांना आवाहन की, अशा संशयित डॉक्टरांची माहिती आमच्या विभागाला कळवा. आम्ही तातडीने अशा डॉक्टरांची तपासणी करून योग्य कारवाई करू.

– संतोष दहेरकर, अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार शहर महापालिका