News Flash

आरोग्य विभागाचा स्थलांतरितांना मानसिक आधार!

स्थलांतरितांना मानसिक आधार देण्यासाठी आरोग्य विभागाने व्यापक योजना राबविण्यास सुरुवात केली आहे

संग्रहित प्रतीकात्मक छायाचित्र - नरेंद्र वासकर

– संदीप आचार्य

देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा फटका बसून महाराष्ट्रात हजारो लोकांवर स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे. या स्थलांतरितांना मानसिक आधार देण्यासाठी आरोग्य विभागाने व्यापक योजना राबविण्यास सुरुवात केली आहे.

महाराष्ट्रात केवळ बिहार, उत्तर प्रदेश आदी राज्यातूनच लोक  नोकरीसाठी येत नाहीत तर आंतरराज्य स्थलांतरितांची संख्याही खूप मोठी आहे. या हातावर पोट असलेल्या व प्रामुख्याने मोलमजुरी करणाऱ्या स्थलांतरितांची सध्या बिकट अवस्था झाली आहे. पोटाला काम नाही आणि राहायला जागा नाही, अशा अवस्थेत हजारो स्थलांतरित मजूर राज्यातील अनेक भागात भटकतांना दिसत आहेत. अनेकांनी बिहार, कर्नाटक तसेच उत्तर प्रदेश या राज्यातील आपल्या गावी पायीच जाण्यास सुरुवात केली असून त्यांचे खाण्यापिण्याचे प्रचंड हाल होत असल्याने यातील अनेकजणांचे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण झाले आहे. राज्यात इतस्ततः फिरणाऱ्या बऱ्याच जणांना नैराश्याने वेढले असून सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत त्यांना कोठेच आशेचा किरण दिसत नाही. महाराष्ट्रात स्थलांतरितांची जी परिस्थिती आहे तशीच परिस्थिती दिल्लीसह अनेक राज्यात असून या स्थलांतरितांना मानसिक आधार मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात दोन जनहित याचिका क्रमांक ४६८/ २०२० व ४६९ /२०२० करण्यात आल्या होत्या. या  याचिकांचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांतील आरोग्य यंत्रणांना स्थलांतरित, बेघर, वृद्धाश्रमातील वृद्ध, गृहिणी तसेच थेट करोनाशी लढणारे डॉक्टर तसेच पोलिसांना मानसिक आधार देण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार राज्याच्या आरोग्य विभागाने एक सर्वंकष उपाययोजना सुरू केली असून या अंतर्गत १०४ क्रमांकाची हेल्पलाईन गतिमान केली आहे.

तसेच राज्यातील पुणे,ठाणे, नागपूर व रत्नागिरी येथील मनोरुग्णालयातील डॉक्टर, अन्य जिल्हा रुग्णालयातील व खाजगी मानसोपचारतज्ज्ञ, मनोविकार उपचार करणाऱ्या परिचारिका, सहाय्यक आदींची २१९ पथके तयार करून राज्यातील ज्या भागात प्रामुख्याने स्थलांतरित आहेत तेथे जाऊन त्यांना मानसिक आधार देण्याचे काम सुरु केले आहे. याशिवाय विविध ठिकाणच्या वृद्धाश्रमात जाऊनही करोना विषयीची माहिती व त्याची काळजी घेण्यासाठी काय करायचे याचे मार्गदर्शन करण्याबरोबरच मानसिक आधार देण्याचे काम ही पथके करतील, असे आरोग्य संचालिका डॉ साधना तायडे यांनी सांगितले. कोणत्या पथकाने किती लोकांना तपासले याचा तपशीलही केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील मानसोपचारतज्ज्ञांचीही मदत घेतली जाणार असून कोणताही मानसोपचार तज्ज्ञाने आपला दवाखाना अथवा रुग्णालय बंद करू नये असे आदेशही आरोग्य विभागामार्फत जारी करण्यात आले आहेत. करोना व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हाताला काम नाही आणि जागोजागी भटकण्याची वेळ आलेल्या स्थलांतरितांना मानसिक आधार देणे हे मोठे आव्हान असल्याचे डॉ साधना तायडे यांनी सांगितले.

अन्य राज्यातील स्थलांतरितांना आपल्या गावी जायचे आहे. मुलाबाळांच्या काळजीने त्यांना पोखरून टाकले आहे. गावी जायचे रस्ते बंद झाले आहेत तर काम नसल्याने गावी बायका मुलांना पैसेही पाठवता येत नसल्याने हा वर्ग निराशेच्या गर्तेत सापडला आहे. राज्यातही रोजचा दिवस ढकलायचा कसा व पोटात ढकलायचे काय हाही प्रश्न या स्थलांतरितांपुढे आहे. अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासनाने स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून त्यांच्या राहाण्याची व जेवणाची व्यवस्था केली आहे. अशा ठिकाणच्या लोकांना मानसिक आधार देण्याचे काम आरोग्य विभागाची पथके करत असल्याचे डॉ साधना तायडे यांनी सांगितले. १०४ क्रमांकावर आमचे डॉक्टर व मानसोपचारतज्ज्ञ गरजूंना मार्गदर्शन करत आहेत. आव्हान खूपच मोठे आहे मात्र खाजगी डॉक्टर तसेच आमच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन जास्तीत जास्त लोकांना मानसिक आधार देण्याचे काम आम्ही करू असा विश्वास डॉ तायडे यांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2020 10:45 am

Web Title: health department provide psychological support to migrants
टॅग : Coronavirus
Next Stories
1 राष्ट्रपतींनीही दिली मोदींच्या आवाहनाला साद, गडकरी, जावडेकरांच्या हातीही दिवे
2 उस्मानाबाद : करोनाबधित रुग्णांची संख्या तीनवर
3 इतिहासात पहिल्यांदाच भाविकांविना पंढरीत चैत्री वारी
Just Now!
X